अभिनेत्री कंगना रणौत आणि सोशल मीडिया वॉर हे काही आता नवं राहिलं नाही. कंगना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून बॉलिवूडसह देशातील घडामोडींवर कंगना परखडपणे तिचं मत मांडत असते. यामुळे कंगनाला अनेकदा ट्रोल व्हावं लागतं. तर ट्रोलर्सना उत्तर द्यायला कंगना मागे हटत नाही. नुकतच कंगनाला तिने शेअर केलेल्या एका फोटोवरून नेटिझन्सनी ट्रोल केलं होतं. या ट्रोलर्सना कंगनाने पुन्हा एकदा तिच्या भाषेत उत्तर दिलं आहे.

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दुर्गाष्टमीच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला होता .यात प्रसादाच्या ताटाचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र कंगनाने शेअर केलेल्या फोटोत प्रसादाच्या ताटात कांदा दिसल्याने नेटकऱ्यांनी कंगनावर लगेचच निशाणा साधला.

एका युजर कंगनाच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ” प्रसादात कांदा कोण खातं” तर दुसरा युजर म्हणाला, “नवरात्रीचा पहिला नियम आहे की कांदा आणि लसूण न खाणं आणि ही प्रसादात कांदा खातेय.”

कंगनाच्या पोस्टवर तिला अनेकांनी ट्रोल केलंय. एक जण म्हणाली, “मूर्ख बाई देवीच्या कढईत कांदा ?, एवढं तर मलाही माहितेय.” कांद्यामुळे कंगनाला अनेकांनी ट्रोल केल्यामुळे सोशल मीडियावर कांद्यादेखील ट्रेंडमध्ये आला होता. कंगनाला सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर कंगनाने एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे, “विश्वास होत नाही की कांदा टॉप ट्रेंडमध्ये आहे. मात्र हे कुणाला दुखावण्यासाठी नव्हत. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की इतर धर्माप्रमाणे तो कट्टर नाही. त्यामुळे त्याचं हे महत्व कमी होऊ देऊ नका. माझा आज उपवास आहे मात्र माझ्या कुटुंबाला प्रसादासोबत सलाड खाण्याची इच्छा आहे त्यामुळे त्यांची थट्टा करू नका.” असं उत्तर कंगनाने ट्रोल करणाऱ्यांना दिलंय.

यापूर्वीच कंगनाने सोशल मीडियावरून तिचा आगामी सिनेमा थलायवी आधी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल मगच ओटीटीवर असं स्पष्ट केलं होत. ‘थलायवी’ सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.कंगनाने मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘थलायवी’ सिनेमा आधी चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असून त्यानंतर तो ओटीटीवर उपलब्ध होईल हे तिने स्पष्ट केलं आहे. शिवाय हे सांगतना कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील काही निर्मात्यांवर आणि मीडियावर निशाणा साधला.