अभिनेत्री कंगणा रणौत प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे आपले मत व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जातात. कंगना रणौत यांनी आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मनोरंजन क्षेत्राबरोबरच त्यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. त्या भाजपाच्या खासदार आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्या मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याच्या मुद्द्यावर बोलल्या आहेत.

कंगणा रणौत यांनी सांगितले की, एक अभिनेत्री असल्याने त्यांना शूटिंगदरम्यान सर्व प्रकारच्या सुविधा आणि सुखसोई उपलब्ध आहेत; परंतु जीवन प्रत्येकासाठी तसे नसते. मासिक पाळीदरम्यान महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या मुद्द्यावरही कंगना रणौत यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि त्या लहान असताना त्यांना या गोष्टी कशा सांगितल्या गेल्या हे सांगितले.

“मी कधीही मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही” : कंगना रणौत

कंगना रणौत म्हणाल्या की, जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा त्यांना मासिक पाळीच्या वेळी मंदिरात जाऊ नका, असे सांगितले जात असे. अभिनेत्री हसून म्हणाल्या, “असा कोणताही अत्याचार नव्हता, त्यांनी मला फक्त आराम करायला सांगितले होते.” त्या म्हणाल्या, “त्या काळात मी कधीही मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही. कारण- मला खूप घाणेरडं वाटायचं. त्यावेळी मला सर्वांना कानाखाली मारायची इच्छा व्हायची. माझं मनही नाही लागायचं. त्यावेळी मम्मी आमच्याबद्दल खूप संवेदनशील व्हायची.”

कंगना रणौत म्हणाल्या, “लोक मंदिरात जाणं किंवा स्वयंपाकघरात जाणं या गोष्टीला विरोध करतात. मला वाटतं की, जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल, तर तुम्ही जावं. मी माझ्या घरात एकटी राहते, म्हणून मला जावं लागतं. म्हणून ज्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, त्यांना स्वयंपाकघरात जावं लागतं.” कंगना रणौत यांनी नकारात्मक आणि सकारात्मक उर्जेशी जोडून या बाबी स्पष्ट केल्या.

कंगना यांनी २००६ मध्ये अनुराग बसू यांच्या महेश भट्ट निर्मित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘वो लम्हे’ (२००६) व ‘लाइफ इन अ मेट्रो’ (२००७) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘फॅशन’ (२००८) या चित्रपटात काम केले, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीने ‘क्वीन’ (२०१४) व ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स'(२०१५) या चित्रपटांसह नवीन उंची गाठली आणि अनेक पुरस्कारही जिंकले. कंगना शेवटच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसल्या होत्या.