आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत. तिने आता ट्विट करून पुन्हा नवा वाद ओढवून घेतला आहे आणि त्यावरून ट्रोलही होत आहे. हे नवे ट्विट्स आहेत ब्रिटनची राणी आणि गांधीजींच्या संदर्भात!

ब्रिटनच्या शाही कुटुंबात सध्या सुरु असलेल्या वादांसंदर्भात तिने भाष्य केलं आहे. प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल यांनी राजघराण्यावर वर्णद्वेषाचे गंभीर आरोप लावले आहेत. या संदर्भात तिने ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय हिची बाजू घेत आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “गेल्या काही दिवसांपासून लोक केवळ एका बाजूवर विश्वास ठेवून एका परिवाराबद्दल गॉसिप करत आहेत, त्यांना गृहित धरत आहेत, त्यांच्याबद्दल मत तयार करत आहेत.मी ही अशी मुलाखत पाहत नाही सास बहु, कटकारस्थानं प्रकारच्या गोष्टी मला कधी आवडल्याच नाहीत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या पूर्ण विश्वात सत्तेवर असणारी ही एकमेव महिला आहे. ती आदर्श सासू, आदर्श पत्नी, बहीण नसेलही पण ती महान राणी आहे. तिने आपल्या पित्याचं स्वप्न पुढे नेलं. राजसत्तेचं रक्षण केलं, कदाचित एखाद्या मुलालाही हे करता आलं नसतं. आपण कोणतीच भूमिका परफेक्ट निभावू शकत नाही. तिने राजसत्तेचं रक्षण केलं आहे. तिला आता महाराणीसारखीच निवृत्ती घेऊ द्या.”

पुढे मात्र कंगनाने गांधीजींबद्दल काही वक्तव्यं केली आहेत आणि त्यांच्यावर अनेक आरोपही तिने ह्या ट्विटमध्ये केले आहेत. केवळ एक बाई आहे म्हणून राणीवर हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि तिच्या वागणुकीवर शंका घेतली जात आहे असं कंगनाचं म्हणणं आहे. आपली बाजू समजावून सांगताना कंगनाने गांधीजींचा आधार घेतला आहे. ती म्हणते, “महात्मा गांधी हे पिता म्हणून वाईट असल्याचा आरोप खुद्द त्यांच्या मुलांकडून झाला होता. पाहुण्यांची शौचालये साफ करायला विरोध केल्याने गांधीजींनी त्यांच्या पत्नीला घराबाहेर काढलं असल्याचीही नोंद आहे. कधी कधी  एक चांगला नेता चांगला पती होऊ शकत नाही परंतु, तरीही त्याला माफ केलं जातं. कारण तो पुरुष आहे.”

यावर कंगनाच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आहेत. पुन्हा ब्रिटीश राजवट यावी अशी इच्छा आहे का, ती राणी कोहिनूर परत करेल का अशा प्रश्नांसोबतच काही लोकांना तिची ही मतं मान्यही आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या नव्या वक्तव्यांनी कंगना काही नवा मोठा वाद तर निर्माण करणार नाही ना, हे काळासोबतच कळेल.