समीर जावळे

Kantara Chapter 1 Review : कांतारा द लिजेंड या चित्रपटाने २०२२ मध्ये लोकांची मनं जिंकली होती. त्यातला क्षेत्रपाल, पंजुर्ली, गुलिगा, वराह अवतार हे सगळं आपल्याला आपलंच वाटलं होतं. या चित्रपटाचे प्रिक्वेल येणार म्हटल्यावर उत्सुकता ताणली गेली होती. मात्र चित्रपट कथेच्या बाबतीत तर मार खातोच पण ना मनोरंजन करतो ना एखादा सामाजिक संदेश देतो. निसर्गाशी खेळाल तर तुमचं काय होईल हे कांतारा ने दाखवून दिलं होतं. त्यामुळे अर्थातच ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर १ कडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण भट्टी फसली आहे.

कांतारा चॅप्टर १ ची कथा थोडक्यात काय?

कांताराची गोष्ट जंगलांमधूनच सुरु होते. कदंब नावाचा एक राजा आहे तो अन्याय अत्याचार करतो, तो बांगराचा राजा आहे. बांगराचे लोक कांतारा जंगलात प्रवेश करत नाहीत. कारण तिथे गुलिगा हा उग्र देव आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. पण तिथल्या लोकांना राजाने गुलाम बनवलं आहे. त्यानंतर त्याला कांतारातल्या जंगलातली एक गोष्ट हवी आहे त्यामुळे तो जंगलात जातो. पुढे काय होतं? ऋषभ शेट्टी कोण असतो? या सगळ्याची उत्तरं आपल्याला चित्रपट पुढे सरकतो तशी मिळत जातात. मोजके काही प्रसंग सोडले तर कांतारा कथेच्या पातळीवर मुळीच समाधान करत नाही. एवढंच नाही तर कांतारा द लिजेंड या चित्रपटात जे प्रश्न आपल्याला पडलेले असतात त्याची उत्तरं या चित्रपटात मिळतात. पण प्रश्न पडतो की प्रेक्षक म्हणून मी इथे उत्तरं मिळवायला आलोय का?

Kantara Chapter 1 Movie Review
कांतारा चित्रपटातील प्रसंग, जाणून घ्या कसा आहे चित्रपट?

युद्धाच्या प्रसंगांचा भडीमार

कांतारा चित्रपटात डोक्यात जातो तो युद्धाच्या प्रसंगांचा भडीमार. चित्रपटाला विशिष्ट वेग देण्यासाठी युद्धाचे प्रसंग टाकण्यात आले आहेत. पण त्यांचा इतका अतिरेक होते की त्या प्रसंगांना डुलकी येते. त्यानंतर होSS करुन कुणी ओरडलं की आपल्याला कळतं हां प्रसंग संपला. मग पुढे चित्रपट पाहू शकतो. मध्यंतरापर्यंतचा भाग युद्धाचे प्रसंग घेऊनही खूप छान झालाय असं म्हणायला जीभ धजावत नाही. त्यानंतर सुरु होतो सेकंड हाफ. सेकंड हाफ मध्ये थोडीशी रंगत आणली आहे ती ऋषभ शेट्टींच्या दोन प्रसंगांनी आणि राजकुमारी कनकावतीच्या रहस्यामुळे. पण बस तेवढे काही मोजके प्रसंग सोडले तर बाकी चित्रपटात काही राम उरत नाही. २ तास ५० मिनिटांचा सिनेमा सुसह्य असला तर आपण पाहू शकतो. पण हा चित्रपट आणि त्याचा आलेख खाली-वर होत राहतो. त्यामुळे तो असह्यतेकडे जातो. काही क्षणांनी तर सिनेमाचा पडदाही प्रेक्षकांकडे हे मी काय या लोकांना दाखवतोय? अशा नजरेने पाहतोय की काय असं वाटून जातं.

चित्रपटातील अभिनय

चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत त्या ऋषभ शेट्टी, गुलशन देवाहा आणि रुक्मिणी यांच्या. त्या सगळ्यांनी त्यांचं काम चोख केलंय. तरीही कुलशेखर या राजाच्या भूमिकेत गुलशन देवाहाला वाया घालवल्याचं फिलिंग येत राहतं. कांताराचा रक्षक अर्थात बेरमेची भूमिका ऋषभ शेट्टीने जीव ओतून केली आहे. पण सुरुवातीचे काही प्रसंग, मध्यंतरानंतरचा एक सिक्वेन्स आणि शेवट हे सगळं सोडलं तर तो बेगडी वाटत राहतो. बाकी राजाच्या भूमिकेत, सेनापतीच्या भूमिकेतले लोक लक्षात राहतात. शिवाय ‘साले’ वगैरे शब्द वापरण्यात आला आहे राजाच्या तोंडी. त्यामुळे आदिपुरुषची आठवण येते. पण कदाचित दाक्षिणात्य संस्कृतीत हा शब्द आधी पोहचला असावा. शिवाय जे कलाकार आधीच्या कांतारामध्ये होते त्यांना छोट्या छोट्या भूमिका ऋषभ शेट्टीने दिल्या आहेत. पण ते देखील खूप अपेक्षापूर्ती करत नाहीत.

चित्रपटातला सर्वात मोठा दोष काय?

कांतारा चित्रपट २०२२ मध्ये आला तेव्हा त्याची तुलना इतर कुठल्याही चित्रपटाशी झाली नव्हती. कारण ओरिजनल कथा, ऋषभ शेट्टीचा दमदार अभिनय आणि शेवटच्या १५ मिनिटांत निसर्गाने मानवाला दिलेली साथ हे सगळं त्यात होतं. शिवाय एका चित्रपटाला जे हवं म्हणजेच ड्रामा, कॉमेडी, रोमान्स, अॅक्शन यांचा तडकाही होता. कांतारा चॅप्टर १ पाहताना आपल्याला पुष्पा २, बाहुबली २ हे आठवत राहतात. युद्धाच्या प्रसंगांमध्ये कलाकाराने साडी नेसण्याच्या प्रसंगात या दोन चित्रपटांची आठवण येते. शिवाय शेवटच्या फाईट सीनमध्येही बाहुबली २ आठवतो. साबुदाण्याची खमंग खिचडी खाताना अचानक गारेचे खडे येऊ लागले की जे फिलिंग येतं तसंच. इतर चित्रपटातल्या प्रसंगांची नक्कल केली तरीही प्रेक्षकांना कळणार नाही असं ऋषभ शेट्टीला वाटत असेल तर त्याने तो भ्रम जितल्या लवकर संपवता येईल तितक्या लवकर संपवला पाहिजे.

चित्रपटाच्या जमेच्या बाजू काय?

चित्रपटाच्या जमेच्या दोन बाजू आहेत. एक म्हणजे कांतारामध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला चॅप्टर १ मध्ये मिळाली आहेत. दुसरी म्हणजे चित्रपटातले सेट आणि व्हिएफएक्स दोन्ही बाप आहेत. चित्रपट व्हिएफएक्समुळे भव्यदिव्य झाला आहे. पण या दोन बाजू सोडल्या तर हा चित्रपट म्हणजे तर्रीदार झणझणीत मिसळ लोकांना आवडली म्हणून त्यात टाका पाणी, अशा प्रकारचा आहे. प्रेक्षकांना आवडणारच हे गृहीत धरुन चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच्या चित्रपटातली उत्तरं मिळतील एवढ्या एका गोष्टीची हिंमत असेल तरच चित्रपट बघा. अन्यथा कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट म्हणजे उद्ध्वस्त अपेक्षाचं भर्जरी लेणं ठरला आहे यात शंका नाही.