Kapil Sharma Caps Cafe Reopens : ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेला कॉमेडियन म्हणजे कपिल शर्मा. आपल्या विनोदी शैलीने त्याने आजवर अनेक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मनोरंजन क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या कपिलने काही दिवसांपुर्वी व्यवसायातही पदार्पण केलं. पत्नी गिन्नीबरोबर त्याने कॅनडामधील सरे इथे नवीन कॅफे सुरू केला होता.

कपिलच्या या नव्या कॅफेचं नाव ‘कॅप्स कॅफे’ असं आहे. मात्र कॅफे सुरू झाल्याच्या अवघ्या तीन दिवसांतच त्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेच्या दहा दिवसांनी हा कॅफे पुन्हा सुरू करण्यात येत आहे. याबद्दल स्वत: कपिल आणि ‘कॅप्स कॅफे’च्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे माहिती देण्यात आली आहे.

‘कॅप्स कॅफे’च्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय, “आम्हाला तुमची खूप आठवण आली. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून आभार. आम्ही पुन्हा तुमचं प्रेम, आपुलकी आणि स्वागत करण्यासाठी तयार आहोत. लवकरच भेटू.”

कपिलनेसुद्धा ही पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत कॅफेच्या टीमला “मला तुमचा अभिमान आहे” असं म्हटलं आहे. दरम्यान, ९ जुलै रोजी कपिलच्या या नव्या कॅफेवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गाडीत बसून बंदुकीने कॅफेच्या दिशेने गोळ्या झाडताना दिसली. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग उर्फ लड्डी याने या घटनेची जबाबदारी घेतली होती.

हरजीत सिंग लड्डीने कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारामागे आपणच असल्याचा दावा सोशल मीडियावर केला होता. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नव्हती, मात्र आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेनंतर कॅफेच्या टीमने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत हिंसेबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. ‘कॅप्स कॅफे’ सुरू करताना आमचा कॉफी, गप्पा आणि लोकांमध्ये आनंद निर्माण करणं हा उद्देश होता. यात हिंसेचा हस्तक्षेप होणं वेदनादायक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिल शर्मा इन्स्टाग्राम स्टोरी

कपिलचा हा कॅफे अतिशय सुंदर आहे. गुलाबी रंगाच्या थीममध्ये सजवलेली ही जागा अनेकांच्या पसंतीस पडली. एका कंटेंट क्रिएटरने शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे कॅफेमधील गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या सजावटीची आणि आकर्षक इंटिरियरची खास झलक पाहायला मिळाली. अशा या सुंदर कॅफेचं हल्ल्यानंतर नुकसान झालं होतं. पण आता हा कॅफे पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.