अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. निर्माता दिग्दर्शक करण जोहरवर सडकून टीका झाली. इतकंच नव्हे तर या सर्व वादामुळे करण जोहर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अजिबात सक्रिय नाही. त्याने ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केलं असून अगदी बोटांवर मोजता येईल इतक्याच लोकांना तो फॉलो करतोय. या ऑनलाइन ट्रोलिंगमुळे आणि कोणीच त्याला पाठिंबा देत नसल्याने आता त्याने MAMI (मुंबई फिल्म फेस्टिव्हल) च्या बोर्डवरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहरने MAMI फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डवरून राजीनामा दिला आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या संचालिका स्मृती इराणी यांना त्याने राजीनामा ई-मेलद्वारे पाठविल्याचं कळतंय. घराणेशाहीच्या मुद्द्यावर चित्रपटसृष्टीतील कोणीच पुढे येऊन त्याला पाठिंबा देत नसल्याने तो फार नाराज असल्याचंही कळतंय. याचमुळे त्याने या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमधून काढता पाय घेतला आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण या फिल्म फेस्टिव्हलची अध्यक्षा आहे. तिने करणला या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचाही सल्ला दिला. मात्र करण त्याच्या निर्णयावर ठाम आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डवर करण जोहर व्यतिरिक्त झोया अख्तर, कबीर खान, सिद्धार्थ रॉय कपूर, विक्रमादित्य मोटवाने आणि रोहन सिप्पी हे कलाकार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar upset with film fraternity for not standing by him decides to quit mami board ssv
First published on: 27-06-2020 at 15:43 IST