Karishma Kapoor EX Husband Sunjay Kapur Property Dispute: बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी निधन झाले. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. १९ जून रोजी दिल्लीच्या लोधी मार्ग येथे त्यांच्यावर कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या संपत्तीबद्दल वाद निर्माण झाला आहे. संजय कपूर यांचे ३० हजार कोटी रुपयांचे उद्योगविश्व कोण सांभाळणार? यावरून कुटुंबात कलह पाहायला मिळत आहे. त्यातच आता अभिनेत्री करिश्मा कपूरनेही हिस्सा मागितला आहे.
नेमके प्रकरण काय?
माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार संजय कपूर यांच्या मातोश्री रानी कपूर यांच्या पत्रामुळे वादळ उठले आहे. संजय कपूर यांच्या सोना कॉमस्टार या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभेआधी रानी कपूर यांनी पत्र लिहून सोना समूहाच्या त्या सर्वात मोठ्या भागधारक असल्याचे म्हटले आहे.
रानी कपूर यांनी पुढे म्हटले की, काही व्यक्ती कुटुंबाचा वारसा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, संजय कपूर यांची द्वीतीय पत्नी असलेल्या करिश्मा कपूर यांनीही आता संपत्तीमध्ये हिस्सा मागितला आहे. तथापि या वृत्ताला करिश्मा कपूर किंवा त्यांच्यावतीने कुणीही दुजोरा दिलेला नाही.
पार्श्वभूमी काय?
रानी कपूर यांनी मुलगा संजय कपूरच्या मृत्यूबद्दलही संशय व्यक्त केला होता. ज्या परिस्थितीत संजय कपूर यांचा मृत्यू झाला, ती संशयास्पद परिस्थिती असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. रानी कपूर यांचे वकील वैभव गग्गर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, “माझ्या अशील म्हणजेच संजय कपूर यांच्या आईसाठी मुलाचा मृत्यू धक्कादायक होता. मृत्यूसंदर्भात जे सांगितले जात आहे, ती परिस्थिती त्यांना मान्य नाही. सत्य समोर येईपर्यंत त्या गप्प बसणार नाहीत.”
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार रानी कपूर यांनीही असाही दावा केला होता की, मुलाच्या मृत्यूनंतर काही कागदपत्रांवर त्यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. त्यामुळेच सोना ग्रुपची होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. नवीन संचालकांच्या नियुक्तीलाही त्यांनी विरोध दर्शविला.
संजय कपूर यांचे उद्योगविश्व किती हजार कोटींचे?
२०१५ साली संजय कपूरचे वडील सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर सोना कॉमस्टर या कंपनीची धुरा त्यांच्या हातात आली. कंपनीला नवी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ब्लूमबर्गच्या मते, सोना कॉमस्टार कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ३१ हजार कोटी (४ अब्ज डॉलर्स) इतके आहे.
संजय कपूर यांना एकूण तीन अपत्य आहेत. दुसरी पत्नी करिश्मा कपूरकडून समायरा (२०) आणि किआन (१४) अशी दोन मुले आहेत. हे दोघेही अद्याप कंपनीचा भाग नाहीत. तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्याकडून अझारियास हा ६ वर्षांचा मुलगा आहे.