छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोचे सध्या १२वे पर्व चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीमध्ये अनेक स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो रुपये जिंकतात. पण केबीसीमध्ये स्पर्धकांनी जिंकलेली रक्कम त्यांना पूर्ण मिळत नाही. त्यांना त्या रक्कमेवर कर भरावा लागतो.

कौन बनेगा करोडपतीमध्ये स्पर्धक जितके पैसे जिंकतात त्यातील काही पैसे त्यांना कर म्हणून भरावा लागतो. जर एखाद्या स्पर्धकाने एक कोटी रुपये जिंकले तर त्याला ती रक्कम पूर्ण मिळत नाही. त्यातील काही रक्कम ही कर म्हणून भरावी लागते. चला जाणून घेऊया स्पर्धकांना केबीसीमध्ये किती रुपये कर भरावा लागतो.

केबीसीत स्पर्धकांना जी रक्कम मिळते त्यावर कर आकारला जातो. प्राप्तिकर कायदा १९६१ मधील सेक्शन ५६(२)(आयबी) अंतर्गत गेम शो, जुगार, लॉटरी, सट्टेबाजी या अंतर्गत मिळालेली रक्कम ही करपात्र आहे.

प्राप्तीकर कायद्यातील कलम १९४ ब नुसार कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात जर एखादा स्पर्धक १ कोटी रुपये जिंकला, तर त्याला एकूण रकमेपैकी ३० टक्के रक्कम कर म्हणून भरावी लागते. १ कोटीच्या तीस टक्के म्हणजे ३० लाख रुपये कर म्हणून भरावे लागतात. इतकंच नव्हे, ३० लाखांच्या करावर १० टक्के अधिभार आकारला जातो. ही रक्कम ३ लाखांपर्यंत जाते. याशिवाय ३० लाखांवर ४ टक्के सेसही आकारला जातो. ही रक्कम १.२ लाखांपर्यंत जाते. त्यामुळे एक कोटी रुपये जिंकलेल्या स्पर्धकाला जवळपास ३४.५ लाख रुपये कर भारावा लागतो. स्पर्धक ६५ लाख रुपये घरी घेऊन जातो. केबीसीमध्ये १० हजार रुपये जिंकलेल्या स्पर्धकाला देखील कर भरावा लागतो.