Kedar Shinde : सुपरस्टार भरत जाधव आणि त्यांच्या नाटकाची हाऊसफुल्ल पाटी हे जणू एक समीकरणच आहे. मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत. त्यात अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोगही झाले आहेत. पण असं असलं तरीही एखाद्या नाटकाचे चार हजारहून अधिक विक्रमी प्रयोग होणं ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे आणि हे झालं आहे ते भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ या नाटकाबद्दल.

केदार शिंदे दिग्दर्शित आणि भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेलं ‘सही रे सही’ नाटक आजही रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. आजही या नाटकसाठी हाऊसफुल्लचा बोर्ड लागतो. मात्र हे नाटक आता अचानक बंद झालं तर? हे नाटक नेमकं कधी बंद होणार याबद्दल स्वतः दिग्दर्शक केदार शिंदे यांनी भाष्य केलं आहे. केदार शिंदे यांनी कंटेंट क्रिएटर नील सालेकरच्या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली होती. यावेळी केदार शिंदे यांनी सही रे सही नाटक नेमकं कधी बंद होणार? याबद्दल भाष्य केलं आहे.

याबद्दल केदार शिंदे म्हणाले की, “‘सही रे सही’ नाटक मी लिहिलं, बसवलं आणि भरत जाधवने ते सादर केलं. शेवटी त्या नाटकात स्टेजवर भरत दिसतो. पण भरत हा शिस्तप्रिय नट आहे. त्यामुळे सही रे सही हे नाटक गेली २३ वर्षे आजतागायत सुरू आहे. म्हणजे मी तेव्हा दोन तास २० मिनिटांचं हे नाटक बसवलं होतं आणि आजही ते नाटक दोन तास वीस मिनिटांचंच आहे.”

यापुढे केदार शिंदेंनी असं म्हटलं की, “भरत ‘सही रे सही’ हे नाटक न कंटाळता करत आहे. साधारण रोज प्रयोग होतात. पण भरतला त्याचा कंटाळा येत नाही. मला मध्ये कोणीतरी विचारलं होतं की, हे नाटक कधी बंद होणार आहे. तेव्हा मी म्हटलं होतं की, ज्यादिवशी भरत जाधव मला म्हणेल की, आता मला जमत नाही. त्यादिवशी ‘सही रे सही’ बंद होईल. कारण ती जागा कोणीच घेऊ शकणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आजवर नानाविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले भरत जाधव आता लवकरच एका नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. भरत जाधव यांचा ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्यांच्याबरोबर अविनाश गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, किरण खोजे. प्राजक्ता हनमघर, पर्ण पेठे आणि रोहीणी हट्टंगडी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.