बॉलिवूडचा ‘खलनायक’ संजय दत्त आज आपला ६२ वाढदिवस साजरा करतोय. यानिमित्ताने संजू बाबाने त्याच्या चाहत्यांसाठी अनोखं गीफ्ट दिलंय. बहूचर्चित ‘केजीएफ २’ चित्रपटात अभिनेता संजय दत्त याच्या ‘अधीरा’ या भूमिकेबाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. संजय दत्त याने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज केलंय. या पोस्टरमध्ये संजय दत्त खूप भयानक रुपात दिसत आहे. संजय दत्त साकारत असलेल्या ‘अधीरा’च्या लुकचे यापूर्वी सुद्धा अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. त्यानंतर आज संजय दत्तने हे नवं पोस्टर रिलीज केलंय.
अभिनेता संजय दत्त याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर रिलीज केलंय. या पोस्टरमध्ये संजय दत्तचा भयानक लुक पाहून ‘केजीएफ २’साठी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढलीय. या पोस्टरमध्ये संजय दत्तने त्याच्या हातात तलवार पकडलेली असून त्याच्या मागे लोकांचा समुह दिसून येतोय. हे पोस्टर शेअर करताना संजय दत्तने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. तसंच ‘केजीएफ २’ मध्ये काम करतानाचा एक वेगळा अनुभव मिळाला असल्याचं देखील सांगितलं आहे.
View this post on Instagram
हे पोस्टर शेअर करताना संजय दत्तने चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत एक नवी अपडेट सुद्धा दिलीय. यात त्याने लिहिलंय, “मला माहितेय तुम्ही भरपूर दिवसांपासून या चित्रपटाच्या रिलीजसाठी प्रतिक्षा करत आहात… मी तुम्हाला विश्वास देतो की हा चित्रपट तुमच्या सर्वांच्या प्रतिक्षेच्या लायक असेल”. साउथ सुपरस्टार यश स्टारर ‘केजीएफ २’ १६ जुलै रोजी रिलीज करण्याचा निर्णय दिग्दर्शक प्रशांत नील यांनी घेतला होता. परंतू करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण त्यानंतर दुसरी रिलीज डेट कोणती असणार आहे, हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
‘केजीएफ’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘केजीएफ २’ भेटीला आणला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा साउथ सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण त्याच्यासोबत अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रविना टंडन सुद्धा दिसणार आहेत.