अभिनेत्री किशोरी शहाणे ह्या मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांसह अगदी हिंदी चित्रपटांत देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवलाय. इतकंच नव्हे तर त्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्येसुद्धा झळकल्या आहेत. अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्या छोट्या पडद्याकडं वळल्या. लाइफ ओकेच्या ‘नागार्जुन-एक योद्धा’ या मालिकेत त्यांनी मनसा देवी या नागदेवतेची भूमिकाही साकारली होती. सध्या त्या ‘गूम है किसी के प्यार मे’ या मालिकेत दिसत आहेत. फक्त मराठी चित्रपटसृष्टीपर्यंतच मर्यादित न राहता त्यांनी अभिनयाचा झेंडा हॉलिवूडमध्येही फडकवलाय. त्यांच्या कामाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांनी कुणाशी लग्न केलंय, त्यांचे पती कोण आहेत व ते काय करतात, याबद्दल खूप कमी जणांना माहित असेल. अभिनेत्री किशोरी शहाणे या एक प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या पत्नी आहेत, हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल.

मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘प्रेम करु या खुल्लम खुल्ला’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. याच चित्रपटामुळे मराठी कलाविश्वाला किशोरी शहाणे हा नवा चेहरा मिळाला. अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी स्वतः इतकं फिट ठेवलंय की त्यांच्यासमोर आजच्या पिढीतील तरूण अभिनेत्री सुद्धा फिक्या पडतील. आजही त्यांचं मनमोहक सौंदर्य पाहून त्यांचे फॅन्स घायाळ होतात.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या इतर फॅन्सप्रमाणेच चित्रपट दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांच्यावर सुद्धा त्यांच्या सौंदर्याने जादू केली आणि बघता बघता या दोघांनी लव्ह मॅरेज केलं. दिग्दर्शक दिपक बलराज यांनी आतापर्यंत तब्बल २२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून त्यांचा ‘जान तेरे नाम’ चित्रपट खूपच गाजला. त्यांनी यापूर्वी ‘आया तूफान’, ‘मुंबई गॉडफादर’, ‘मालिक एक’, ‘शिर्डी साई बाबा’ सारखे बरेच हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. इतकंच नव्हे तर किशोरी यांचे सासरे बलराज वीज यांनी बॉलिवूडचे ‘हिमॅन’ धर्मेंद्र सोबत देखील अनेक भूमिका साकारल्या आहेत.


दिग्दर्शक दीपक वीज हे बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या ‘हफ्ता बंद’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. त्यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ आणि किशोरी शहाणे हे खूप चांगले मित्र-मैत्रीण होते. किशोरी शहाणे त्यावेळी मराठी चित्रपटांत काम करत होत्या. जॅकी श्रॉफ यांनी त्यावेळी ‘हफ्ता बंद’ चित्रपटासाठी दिग्दर्शक दीपक वीज यांना एका मराठी अभिनेत्रीची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी दीपक आणि किशोरी शहाणे यांची भेट करून दिली. त्यावेळी दीपक यांनी किशोरी शहाणे यांची चित्रपटातील भूमिकेसाठी निवड देखील केली. सेटवर काम करताना ते एकमेकांना आणखी जवळून ओळखू लागले. बघता बघता त्यांच्यात मैत्री झाली. काही दिवसांच्या भेटीगाठीनंतर त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.


अभिनेत्री किशोरी शहाणे आणि दीपक वीज यांना एक मुलगा असून बॉबी असं त्याचं नाव आहे. तो लहान असताना वडिलांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ आणि ‘मालिक एक’ अशा साईबाबांच्या दोन चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या आहेत. त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण करावं, अशी अभिनेत्री किशोरी शहाणेंची इच्छा आहे.