स्वयंघोषित समीक्षक कमाल आर खानची ओळख ही व्यर्थ बडबड करणारा माणूस अशीच आहे. ‘बाहुबली २’ सिनेमात भल्लालदेवची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या राणा डग्गुबतीने केआरकेला ट्विटरवर ब्लॉक केले तेव्हा त्याला तो अपमान वाटला. केआरकेने नंतर राणाबद्दल अपशब्द बोलायलाही सुरूवात केली. कमालने ‘बाहुबली २’ सिनेमाचा रिव्ह्यू दिला होता. यात त्याने बाहुबली हा सिनेमा निरर्थक असल्याचे म्हटले होते.
केआरकेने एक स्क्रिन शॉट शेअर करत ट्विटमध्ये म्हटले की, ‘मी राणाला कधी फॉलोच केले नाही. शिवाय त्याच्याबद्दल कधी लिहिलेही नाही. तरी त्याने मला ब्लॉक केले. यावरून त्याला डोकं नसल्याचं स्पष्ट कळतं.’ केआरकेच्या या बातमीवर राणाने केआरकेला वर्षभरापूर्वीच ब्लॉक केलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
https://twitter.com/kamaalrkhan/status/859255203584815104
पण एवढं बोलून थांबेल तो कमाल कसला. त्याने पुढे अजून एक ट्विट करत प्रभास आणि राणाला त्यात नमूद करत म्हटलं की, ‘प्रभासचे ट्विटरवर ८८ हजार फॉलोअर्स आहेत तर राणाचे २६ लाख फॉलोअर्स आहेत. या दोघांचे फॉलोअर्स एकत्रित केले तरी या दोघांची तुलना ‘द ब्रॅण्ड केआरके’शी होऊ शकत नाही.’
केआरकेने ‘बाहुबली २’ला अतिशय वाईट सिनेमा असे म्हटले होते. पण त्याच्या म्हणण्याला फारशी किंमत नाही हे बाहुबलीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून कळतं. कोणत्याही कलाकाराविषयी निरर्थक बोलण्याची केआरकेची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना लक्ष्य केले होते. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हानेही केआरकेला ब्लॉक केले होते.