ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने काल निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज (५ मे) रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कलाकारांसह अनेक नेते मंडळी सुलोचना दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.

तर आज सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना दीदींच्या निधनाची बातमी कळताच कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांनी ट्वीट करत सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली.