Sidhu Moosewala’s Concert : दिवंगत लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर आता गायकाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामधून तो पुन्हा एकदा गाण्याचं सादरीकरण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या पोस्टमुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे.
सिद्धू मुसेवालाच्या टीमने सोमवारी (१४ जुलै) ही पोस्ट शेअर केली होती. यामधून त्यांनी “Signed to God” नावाच्या वर्लड टूरची घोषणा केली आहे, जिथे मुसेवालाची स्टेजवरील उपस्थिती 3D होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून पुन्हा तयार केली जाईल. सिद्धू हा पहिला भारतीय असेल, ज्याचा मृत्यूनंतरही इतक्या मोठ्या प्रमाणावर परदेश दौरा पार पडणार आहे.
सिद्धू मुसेवालाच्या “Signed to God” वर्ल्ड टूरची घोषणा
‘बॉलीवूड लाईफ’च्या वृत्तानुसार सिद्धू मुसेवालाच्या “Signed to God” या वर्लड टूरची तीन दिवसांपूर्वीच घोषणा झाली असून २०२६ मध्ये हा दौरा सुरू होणार आहे. हा दौरा सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली म्हणून असेल असं म्हटलं जात आहे. सिद्धू मुसेवालाच्या टीमने इन्स्टाग्रामवर या संदर्भात पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या दौऱ्यामध्ये सिद्धूच्या आवाजासह अनेक सिनेमॅटिक व्हिज्युअल्स आणि थ्रीडी होलोग्राफिक प्रोजेक्शन्स अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. हा दौरा २०२६ मध्ये पार पडणार आहे, तर हा दौरा टोरंटो, लंडन आणि लॉस एंजेलिससारख्या शहरांसह पंजाबमध्ये आयोजित केला जाईल.
‘Signed to God’च्या आयोजकांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की, “हा दौरा चौकटीबाहेर जाऊन काहीतरी नवीन करणाऱ्या आणि त्यातून प्रेरणा देत राहणाऱ्या व्यक्तीचा उत्सव आहे.” सिद्धू मुसेवालाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.