‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा प्रकार समाजामध्ये रूजला आहे का हा अभ्यासाचा विषय ठरू शकतो. परंतु, टीव्ही मालिकांची दुनिया आणि बॉलीवूडमधल्या कलावंतांच्या गाजणाऱ्या जोडय़ा आणि त्यांची लिव्ह इन रिलेशनशिप हा बी-टाऊनच्या गॉसिप कट्टय़ावर सदाहरित विषय आहे.
सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती रणबीर कपूर-कतरिना कैफ या जोडीची. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघे आहेत ही जुनी खबर झाली. परंतु, अलिकडेच वांद्रे येथील कार्टर रोडवर रणबीरचे म्हणे नवीन अपार्टमेंट असून त्याचे नूतनीकरण आणि अपार्टमेंटची अंतर्गत सजावट यासाठी रणबीर-कतरिना अनेक ठिकाणी खरेदी करताना दिसून आले आहेत. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या अफवा असल्या तरी सध्या तरी तसे काही दिसत नाहीये. अयान मुखर्जी आणि करण जोहर हे कतरिना-रणबीरचे जवळचे मित्र असून त्यांनी अलिकडेच अपार्टमेंटमध्ये जाऊन लिव्ह इन जोडीची भेट घेतली. रणबीरच्या अपार्टमेंटचे काम आता पूर्ण झाले असून याच आठवडय़ात रणबीर-कतरिना कायमस्वरूपी म्हणजे लिव्ह इनमध्ये असेपर्यंत या अपार्टमेंटमध्ये राहणार आहेत.
बॉलीवूडमध्ये आपल्या पद्धतीने काम करणारा अभय देओलची जोडी जमलीय प्रीती देसाईसोबत. नेहमीची पठडी सोडून अभिनय, चित्रपट, जाहिराती करणारा अभय देओलची ‘देव डी’ चित्रपटादरम्यान प्रीती देसाईशी ओळख झाली आणि तेव्हापासून दोघे लिव्ह-इनमध्ये आहेत. त्यांची केमिस्ट्री इतकी जुळली की अभय देओलने चक्क ‘वन बाय टू’ या चित्रपटाची निर्मितीही केली. परंतु, हा चित्रपट आपटला. नेहमीच ‘हटके’ करण्याच्या प्रयत्नात असलेला अभय देओल-प्रीती देसाई यांचे गुफ्तगू मात्र आजही सुरूच आहे. तिसरी जोडी आहे सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची लिव्ह इन रिलेशनशिप एका चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. आता तर त्यांचे लग्न लवकरच होणार आहे. परंतु, सध्या तरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये दोघे एकत्र राहत आहेत. स्लमडॉग मिलिऑनेर या चित्रपटातील प्रमुख भूमिकेमुळे चर्चेत आलेला देव पटेल आणि त्यातील त्याची सहकलावंत फ्रेडा पिंटो हेही लिव्ह-इन मध्ये आहेत. चित्रपटात रोमान्स करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. चार वर्षांपासून एकत्र राहत आहेत.
पप्पू पास हो गया चित्रपटाच्या सेटवर कश्मीरा शहा आणि कृष्णा अभिषेक यांची भेट झाली आणि २००७ पासून दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत आहेत. मधेच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या पण त्या अफवा ठरल्या. आता कृष्णाने कश्मीराला लग्नाबाबतही विचारणा केली आहे.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने अंकिता लोखंडे-सुशांत सिंग राजपूत यांचे प्रेम जुळवले. त्यानंतर सुशांतने मोठय़ा पडद्यावर पदार्पण केले असले तरी त्यांची लिव्ह इन रिलेशनशिप चांगली टिकून आहे. लवकरच ते विवाह बंधनाच्या ‘पवित्र रिश्ता’मध्ये अडकणार आहेत.
बॉलीवूड, छोटा पडद्यावरील मालिकांमध्ये एकत्र काम करणाऱ्या अनेक कलावंतांच्या जोडय़ा जमल्या आहेत. परंतु, गेल्या काही काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रमाण वाढताना दिसतेय.