प्रवाह अवरुद्ध जाहला!

हिंदू समाजमानसाची माथी भडकवून आपली सत्तेची पोळी त्यावर भाजण्याचा उद्योग राजकारणी करीत आहेत.

न वो न्मे षां चा

रवींद्र पाथरे

साधारणत: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयएनटी, पुरुषोत्तम करंडक आदी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाची धामधूम सुरू होते. परंतु या वर्षी कॉलेजच न उघडल्याने तरुणाईच्या रंगगुणांना वाव देणारी ही व्यासपीठं यंदा सुनीसुनी आहेत. करोनाच्या दहशतीमुळे गेल्या शैक्षणिक वर्षांतील सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ न शकल्यामुळे आणि करोनाचा कहर संपण्याची काहीच लक्षणे नजीकच्या काळात दृष्टिपथात नसताना या परीक्षा आता कशा घ्यायच्या, मुळात त्या घ्यायच्या की नाहीत, यावरून देशभरात सध्या प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. पालक, विद्यार्थी, शाळा-कॉलेजे, विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र व राज्य सरकारे, रिकामटेकडे राजकारणी असे सगळेच जण आपापल्या हितसंबंधांनुसार त्यावर मत-मतांतरे व्यक्त करीत आहेत.. धरसोड वृत्तीचे सल्ले देत आहेत. त्यातून हा गोंधळ आणखीनच वाढलेला आहे. असो. तर अशा वातावरणात कसल्याही प्रकारच्या नाटय़स्पर्धा होणं अशक्यच आहे. त्यामुळे तरुणाईचा चांगलाच हिरमोड झाला असेल तर त्यात खचितच आश्चर्य नाही. कारण अनेक तरुणांच्या भविष्यातील वाटा या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धातून खुल्या होतात. ज्यांना अकादमिक शिक्षणापेक्षा या मार्गे आपलं कला क्षेत्रात करिअर घडवायचं असतं त्यांच्यासाठी ही एक प्रकारे अलिबाबाची गुहा असते. केवळ एका आयएनटी, पुरुषोत्तम करंडक वा ‘लोकांकिका’सारख्या स्पर्धेने अनेक सर्जनशील कलावंत तरुणांना आपला जीवनमार्ग सापडल्याची उदाहरणं आहेत. पूर्वी राज्य हौशी नाटय़स्पर्धा हे असं एक व्यासपीठ होतं. आता या स्पर्धेत निव्वळ ‘हौशी’(च) रंगकर्मी तेवढा सहभाग घेतात. त्यातून नाटक-चित्रपटांत करिअर घडण्याची शक्यता आजघडीला धूसर झाली आहे. परंतु ऐन कॉलेजात असतानाच आज आयएनटी, लोकांकिका वा पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत तुम्ही एकदा का चमकलात की तुम्हाला नाटय़-मालिका क्षेत्रांची कवाडं ‘खुल जा सिमसिम’ म्हणत उघडी होतात. त्यामुळे या स्पर्धा न होणं याचा सरळ अर्थ आहे की यंदा होतकरू तरुण रंगकर्मीचा नवनवोन्मेष अवरुद्ध होणं होय. एका अर्थी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत उमेदीचं एक वर्ष वाया जाणं होय. एवढंच नव्हे तर या स्पर्धामधून अनेक नवे लेखक लिहिते होतात.. ज्यांच्या लेखणीतून वर्तमान, ताज्या घटना, घडामोडी, विषयांची मांडणी केलेली आढळते. त्यावर त्यांचं म्हणून एक भाष्यही असतं त्यात. सद्य:परिस्थितीवरील टीका असते. त्यातून तरुणाईच्या मनात काय चाललंय याचा कानोसा घेता येतो. अन्य कुठल्याही व्यासपीठावर इतक्या मोकळेपणानं तरुणाईलाच काय, पण कुणाही लेखकाला व्यक्त होता येत नाही. अनेक गोष्टी आडव्या येतात. तरुणाईच्या अभिव्यक्तीतून जो जोश, बिनधास्त बेडरपणा या स्पर्धातून दिसतो तसा तो इतरत्र व्यक्त होणं/ व्यक्त करणं भोवतालच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक तसंच सांस्कृतिक वातावरणाच्या दबावामुळे बऱ्याचदा शक्य होत नाही.. किंवा ते कठीण जातं म्हणा. मराठा आरक्षण, स्त्री-पुरुष संबंधांतील राजकारण, समलिंगी संबंध, आर्टिफिशियल इंटिलिजन्स व त्याचे भविष्यातील भीषण परिणाम, समाजातील खटकणाऱ्या गोष्टी व त्यावरची त्यांची रोखठोक मतं, देशातील सरकारच्या धोरणांसंबंधी भाष्य करणारं वा टीकात्मक असं काहीही.. ज्यावर ही मुलं आपल्या एकांकिकांतून बेधडक व्यक्त होत असतात. अशा संवेदनशील विषयांवरील अभिव्यक्तीच्या संभाव्य परिणामांची त्यांना बिलकूल तमा नसते. त्यांना सामोरे जायची निडर वृत्ती त्यांच्यात असते. हे फक्त आणि फक्त आज तरुणाईच्या अशा स्पर्धातूनच शक्य आहे.. शक्य होतं.

म्हणूनच या स्पर्धाचं नसणं हे जिव्हारी लागणारं आहे. सर्जनशील कलावंतांच्याही.. आणि त्यांचे आविष्कार पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या जाणकार प्रेक्षकांच्याही! या स्पर्धामध्ये अनेक वेगळे विषय, आशय ताकदीने मांडले गेल्याच्या आठवणी त्यामुळेच दाटून येताहेत. पुण्यात सार्वजनिक ठिकाणी विराजमान असलेला नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा समाजकंटकांनी काढून टाकल्याच्या घटनेवर आधारित ठोस, बुद्धिमान मांडणी करणारी ‘सॉरी परांजपे’ ही एकांकिका करण्याचं धाडस पुण्यातलीच मुलं करतात तेव्हा त्यांच्या धाडसाचं प्रचंड कौतुक वाटतं. किंवा मराठा आरक्षणाच्या मागणीने सबंध राज्य राजकारणग्रस्त झालेलं असताना त्यावर बिनधास्तपणे भाष्य करणारी एकांकिका त्या वर्षीच्या ‘लोकांकिका’ स्पर्धेत महाविद्यालयीन मुलांनी सादर केली होती. २६ जुलै २००५ मधील मुंबईतील जलप्रलयावरील प्रत्ययकारी एकांकिका त्याच वर्षी लगोलग आयएनटी स्पर्धेत सादर झाली होती. स्त्री-पुरुष संबंधांवर तसंच समलिंगी संबंधांवरही कुठल्याही दबावांची फिकीर न करता मुलांनी या स्पर्धातून आपली अभिव्यक्ती सादर करण्याचं अनेकदा धैर्य दाखवलेलं आहे. संतोष पवार यांची ‘यदा कदाचित’ ही महाभारतासह विविध काळांतल्या पात्रांवरील विडंबनपर एकांकिका प्रथम आयएनटीतच सादर झाली होती. पुढे भारतीय देवदेवतांची थट्टा व विटंबना केल्याचा आरोप करून तिला प्रचंड विरोध झाला. मात्र, आयएनटीच्या सुजाण प्रेक्षकांना तसं काही तीत आढळलं नव्हतं. ‘पुरुषविरहित पृथ्वी’ या विषयावरही अत्यंत प्रभावी एकांकिका या स्पर्धेत सादर केली गेली होती. १९९३च्या मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या साखळी बॉम्बस्फोटांवरील ‘आरडीएक्स’ नावाची एकांकिका त्याच वर्षी स्पर्धेत पाहायला मिळाली होती. ज्यांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते त्यांच्याच समाजातील निरपराध लोकही त्यात बळी गेले होते. ‘दहशतवादाला धर्म असतो का?’ हा प्रश्न या एकांकिकेत अत्यंत प्रभावीपणे उपस्थित करण्यात आला होता.

सध्या ‘हिंदुत्ववाद’ हा सबंध देश व्यापून दशांगुळे उरलेला मुद्दा आहे. हिंदू समाजमानसाची माथी भडकवून आपली सत्तेची पोळी त्यावर भाजण्याचा उद्योग राजकारणी करीत आहेत. या वातावरणाची चाहूल लागलेल्या वातावरणात एके वर्षी गांधीजींवरील एक एकांकिका आयएनटी स्पर्धेत सादर झालेली आठवते. तरुणांना या बदललेल्या वातावरणाबद्दल व्यक्त व्हावंसं वाटणं हेच खरं तर महत्त्वाचं होतं. या एकांकिकेचा प्रयोग सुरू असताना गांधीजींची भूमिका करणारा मुलगा दीपप्रज्वलनासाठी लावलेल्या समईजवळून एन्ट्री घेत असताना चुकून त्याचं उपरणं समईच्या वातीला लागलं आणि त्याने पेट घेतला. प्रेक्षागारात क्षणभर सन्नाटाच पसरला. त्या मुलाच्याही ते ध्यानी आलं. परंतु त्याने घाबरून प्रयोग न थांबवता, भूमिकेतून बाहेर न येता अत्यंत गांभीर्यपूर्वक, प्रसंगावधान राखून ते उपरणे सहजगत्या खांद्यावरून काढून खाली टाकलं. प्रयोग जणू काही घडलंच नाही अशा तऱ्हेनं पुढे सुरू राहिला.. ही ताकद त्या मुलांच्या समर्पिततेची तर होतीच, पण जे महान व्यक्तिमत्त्व आपण साकारतोय, त्या व्यक्तीच्या असीम धैर्याची शान राखण्याचं अवधानही त्या मुलाने त्यावेळी दाखवलं होतं.

एक मात्र खरंय, की सद्य:कालीन हिंदुत्ववादी सर्वभक्षकाय वातावरणात महाविद्यालयीन तरुणाईने त्या बहकाव्यात येऊन हिंदुत्ववादाचा जयघोष करणारी एकांकिका सादर केल्याचं एकही उदाहरण आठवत नाही.

अशा कितीतरी आठवणी..

करोनाकाळातलं हे थोडंसं कवित्व!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lokankika and one act play competition hit by coronavirus zws

ताज्या बातम्या