लोकसत्ता प्रतिनिधी

छोटय़ा पडद्यावर सध्या मोठय़ा घडामोडी सुरू आहेत. जवळपास सर्व मराठी वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू झाल्यात आहेत तर काही नवीन मालिका येत्या काही दिवसांत प्रसारित होणार आहेत. या नव्या मालिकांमुळे आता सध्या प्रसारित होत असलेल्या जुन्या मालिकांनी निरोप घेतला आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’, ‘प्रेमाची गोष्ट’ या दोन नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. लवकरच ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रसारित होणार आहे. तर, ‘साधी माणसं’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन नव्या मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या निमित्ताने खास पुण्यातील ढेपेवाडय़ात मालिकेतील रणदिवे कुटुंबाचे सदस्य कलाकार आणि वाहिनीचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या ‘सोहम प्रॉडक्शन’ने या मालिकेची निर्मिती केली असून राहुल लिंगायत हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. या मालिकेमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. तर, बाळूमामांच्या भूमिकेतून घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता सुमित पुसावळे तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, भक्ती देसाई, सुनील गोडसे आदी नवे-जुने प्रसिद्ध कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

हेही वाचा >>>तरुणाईचा लाडका गायक आतिफ अस्लमने लेकीची दाखवली पहिली झलक; म्हणाला…

या मालिकेच्या निमित्ताने कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पुण्याच्या ढेपे वाडय़ात या कुटुंबातील मुख्य जोडी असलेल्या हृषीकेश (सुमीत)-जानकीच्या (रेश्मा) लग्नाचा दहावा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. वाडा हे एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रतीक समजले जाते, अशी एकत्र कुटुंब संस्कृती जपणारे रणदिवे कुटुंब खास यानिमित्ताने ढेपे वाडय़ात एकत्र आले होते. यावेळी स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे, निर्माते सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर आणि सोहम बांदेकर यांच्याबरोबर अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमित पुसावळे यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

  ‘स्टार प्रवाह’च्याच दीर्घकाळ चाललेल्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेची नायिका रेश्मा शिंदे या नव्या मालिकेत जानकीची भूमिका करते आहे. जानकी या नव्या व्यक्तिरेखेबद्दल रेश्मा सांगते, ‘अनेक मोठे कलाकार एकत्र असलेले चित्रपट आपण पाहिले आहेत. पण एका मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांचा एकत्रित अभिनय पाहायला मिळणं हे फार क्वचित घडतं. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत सगळे उत्तम कलाकार एकत्र आले आहेत. आपल्या पूर्वीच्या कामातून प्रत्येकाची चाहत्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांची नव्या मालिकेत भूमिका काय असेल याबद्दल साहजिक उत्सूकता असणारच. माझी व्यक्तिरेखा जानकी ही आजच्या काळातील गृहिणी आहे. ती महाविद्यालयातील सर्वात हुशार डबल ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे. तरी तिने आपली कारकीर्द करायचं स्वप्न सोडून गृहिणी होण्याचा मार्ग निवडला आहे. तिने हा निर्णय का घेतला आणि ती गृहिणी म्हणून आपल्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पार पाडते आहे याचं चित्रण या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे’. 

हेही वाचा >>>मराठी बिग बॉस जिंकल्यावर २५ लाखांपैकी निम्मेही पैसे मिळाले नाहीत, शिव ठाकरेचा मोठा खुलासा; म्हणाला, “आई-बाबांच्या तिकिटाचे…”

 दीर्घकाळ बाळूमामांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेला सुमीत या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच कौटुंबिक नाटय़ रंगवताना दिसणार आहे. सुमीतने बाळूमामांच्या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात होता. मात्र मुळात त्या मालिकेत बाळूमामांच्या आयुष्यातील संध्यापर्वाचे चित्रीकरण सुरू आहे. त्या मालिकेचा वेगळा टप्पा आणि त्याच वेळी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या भूमिकेसाठी विचारणा झाल्याने सुमीतने या नव्या मालिकेसाठी होकार दिल्याचे सांगितले. यात तो हृषीकेश रणदिवे ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. रणदिवे कुटुंबातील मोठा मुलगा आणि उद्योजक असलेल्या हृषीकेशचा एकत्र कुटुंब पद्धतीवर विश्वास आहे. त्याचा आणि जानकीचा प्रेम विवाह झाला आहे. तो जानकीला रणदिवे कुटुंबात येण्यासाठी कसं राजी करतो? आणि त्यांची या कुटुंबातील पुढची वाटचाल हे नाटय़ मालिकेतून अनुभवायला मिळणार असल्याचं सुमीतने सांगितलं.

गेली काही वर्ष मालिका निर्मिती क्षेत्रात बांदेकर पती-पत्नींनी आपलं स्थान बळकट केलं आहे. वाहिन्यांच्या टीआरपीच्या गणितात नव्या मालिका टिकवून ठेवणं हे आव्हान असल्याचं सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं. प्रेक्षकांना मालिकेत गुंतवून ठेवण्यासाठी दररोज वेगवेगळे प्रयोग करत राहावे लागतात. या मालिकेतही एकत्र कुटुंब पद्धतीमधील संस्कार, समजून घेण्याची आणि मोठय़ांच्या विचारांचा मान ठेवण्याची गोष्ट आहे. आज या गोष्टी हरवत चालल्या आहेत. त्याची जाण आजच्या पिढीला झाली तर एकत्र कुटुंब पद्धतीचा आग्रह ते धरतील आणि एकटेपणाच्या म्हणून ज्या समस्या आज निर्माण झाल्या आहेत त्या कमी व्हायला मदत होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर आजच्या पिढीने नक्कीच एकत्र कुटुंबातील गंमत अनुभवलेली नाही. आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकी, भावंडं एका घरात नांदतात तेव्हा काय गमती होतात आणि समोर आलेल्या बऱ्या-वाईट प्रसंगांना ते एकत्र कसे सामोरे जातात याचा अनुभव देण्याचं काम या मालिकेच्या माध्यमातून होईल, असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं.

 ‘स्टार प्रवाह’ सध्या महाराष्ट्रातील नंबर एकची वाहिनी ठरली आहे. व्यवसाय प्रमुख या नात्याने यशाचं हे समीकरण टिकवून ठेवताना सातत्याने मालिकेत वेगळे काय देता येईल याचा विचार करावा लागतो, असं सतीश राजवाडे यांनी सांगितलं. ‘एखादी नवीन मालिका बनवताना काही ठरावीक पात्रं गरजेची असतात. मालिकेत पात्रं जास्त असतील तर त्यांचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर सादर करता येतात. त्यातल्या कुठल्या ना कुठल्या पात्राशी प्रेक्षक जोडला जातो आणि त्यामुळे मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी होते’ असं राजवाडे यांनी सांगितलं.