scorecardresearch

Premium

ओढ मराठी चित्रपटांची!

हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी अशा सहा चित्रपटसृष्टीतून आपली छाप उमटवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुखने आपल्या मनमिळावू स्वभावाच्या आणि अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

genelia deshmukh
जेनेलिया देशमुख

हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी अशा सहा चित्रपटसृष्टीतून आपली छाप उमटवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुखने आपल्या मनमिळावू स्वभावाच्या आणि अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अनेक वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी जेनेलिया समाजमाध्यमांवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. नेहमीच प्रेक्षकांसाठी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेनेलियाने साकारलेल्या ‘वेड’ या चित्रपटातील श्रावणीच्या व्यक्तिरेखेचे सगळय़ांनी भरभरून कौतुक केले. आता ती पुन्हा एकदा ‘ट्रायल पीरियड’ या हिंदी चित्रपटातून मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. मुलाच्या इच्छेखातर ‘ट्रायल पीरियड’वर बाबा मागवणाऱ्या आईची व्यक्तिरेखा जेनेलियाने साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संवाद साधताना वैविध्यपूर्ण मराठी चित्रपटांच्या निर्मितीवर भर देण्याचा मानस तिने व्यक्त केला.

जेनेलिया गेली काही वर्ष सातत्याने पती रितेश देशमुखबरोबर मराठी चित्रपट निर्मितीत सक्रिय राहिली आहे. मराठी चित्रपटातील छोटेखानी भूमिकांनंतर तिने यावर्षीच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटातून बऱ्याच काळानंतर मोठी भूमिका केली. मराठी चित्रपटांकडे असलेला हा ओढा यापुढेही कायम राहणार असल्याचे तिने सांगितले. इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटात तिच्यासाठी एखादी चांगली भूमिका असेल तर ती करायची इच्छाही तिने बोलून दाखवली. ‘वेड’च्या प्रदर्शनानंतर सहा महिन्यांनी ‘ट्रायल पीरियड’ या अलेया सेन दिग्दर्शित हिंदी चित्रपटातून जेनेलिया प्रेक्षकांसमोर आली आहे. हा चित्रपट जिओ सिनेमा अ‍ॅपवर प्रदर्शित झाला आहे.

viju-mane-marathi-industry
मराठी चित्रपट का चालत नाही? विजू मानेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “बऱ्याच मंडळींना वाटतं की…”
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’
sadhu meher passes away at mumbai residence
ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते साधू मेहर यांचे निधन
Loksatta lokrang Popular actor Piyush Mishra on the stage of Loksatta Gappa
अभिनय ही गांभीर्यानं करण्याची बाब!

 २००३ मध्ये जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर कधी दाक्षिणात्य कधी हिंदी चित्रपटातून ती भूमिका करत राहिली. या दोन दशकांच्या कारकीर्दीतील बदलांविषयी सांगताना अभिनेत्रीच्या दृष्टीने विचार करता खूप गोष्टी बदलल्या आहेत, असं ती म्हणते. ‘मी चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा पुरुषांचेच वर्चस्व अधिक असायचे, स्त्रिया फार कमी पाहायला मिळायच्या. तेव्हापासून ते आता मी ज्या चित्रपटात काम करते आहे त्याची दिग्दर्शिका एक स्त्री आहे ही फार मोठी गोष्ट आहे,’ असं जेनेलियाने सांगितलं. दिग्दर्शक म्हणून अलेयाच्या कामाची पद्धत अधिक भावल्याचंही तिने सांगितलं.

 चोखंदळ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता मानव कौलबरोबर जेनेलियाने पहिल्यांदाच काम केलं आहे. ‘मानवबरोबर सेटवर पहिल्याच दिवशी माझी मैत्री झाली’ असं सांगतानाच भाषा आणि साहित्याबद्दलचे त्याचे ज्ञान या दोघांच्या मैत्रीतला धागा असल्याचंही तिने स्पष्ट केलं. ‘मला साहित्याविषयी जास्त माहिती नव्हती, पण मानवमुळे मला भाषा आणि साहित्य या गोष्टींबद्दल कळलं. त्याने मला अनेक पुस्तकं वाच म्हणून सुचवले. आमच्यामध्ये पुस्तकांविषयी सातत्याने बोलणं व्हायचं, त्यामुळे माझ्या भाष्य शास्त्रात आणि साहित्यात आणखी भर पडली’ असंही तिने सांगितलं.

 तारुण्यातील प्रेमकथांपलीकडला..

 ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट का करावासा वाटला याविषयी बोलताना आपल्याकडचे बहुतांशी हिंदी चित्रपट हे विशी-तिशीच्या प्रेमकथांमध्येच रमलेले दिसतात. खूप कमी दिग्दर्शक आहेत जे त्यापलीकडे जाऊन विचार करतात, त्यामुळे या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हाच मी होकार दिला, असं तिने सांगितलं. या चित्रपटात तिने पहिल्यांदाच आईची भूमिका केली आहे. ‘या आईचे एक वैशिष्टय़ म्हणजे ती एकल पालक असली तरी ती उदास नाही. ती आणि तिचा मुलगा या दोघांच्याच विश्वात ती खूप खूश आहे. ती अजिबात मुळुमुळु रडणारी नाही. अरे बापरे माझा नवरा बरोबर नाही, आता मी काय करू? या विचाराने हताश होऊन बसणाऱ्यांपैकी ती नाही. त्यामुळेच ही भूमिका मला अधिक आवडली’ असं तिने सांगितलं. या भूमिकेमुळे वैयक्तिकरीत्या तिच्यातही बदल झाल्याचं तिने सांगितलं. ‘मी याआधी ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातल्या आदितीसारखी फटकळ होते, पण आता तेच मी काही बोलायचं असेल तर विचार करून बोलते. आधी मी माझ्या कुटुंबाचा विचार करते, हा बदल या चित्रपटामुळे माझ्यात झाला,’ असं ती मोकळेपणाने सांगते.

‘बंगाली व्यक्तिरेखा साकारणं जरा अवघड’

 ‘मी कधीच बंगाली चित्रपटात काम केलेलं नव्हतं, त्यामुळे ‘ट्रायल पीरियड’मध्ये बंगाली व्यक्तिरेखा साकारणं हा माझ्यासाठी थोडा कठीण अनुभव होता,’ असं जेनेलियाने सांगितलं. या चित्रपटाची दिग्दर्शिका अलेया सेन स्वत: बंगाली आहे. ‘अलेयाने गोष्टी आधीच चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या. आपण जेव्हा त्या पात्रासारखे दिसू लागतो तेव्हा पन्नास टक्के काम झालेले असते. उरलेले पन्नास टक्के काम अलेयाने मला पात्राविषयी जे समजावून सांगितलं त्यामुळे सहजसाध्य झालं,’ असंही तिने स्पष्ट केलं.

‘ स्त्रिया एकेरी पालकत्वही उत्तम निभावतात’

 या चित्रपटातील भूमिकेच्या निमित्ताने बोलताना स्त्रिया एकेरी पालकत्वही उत्तम निभावतात असं मत जेनेलियाने व्यक्त केलं. ‘प्रत्येक आई ही अप्रतिम असते. कोणतीही आई नेहमी शंभर टक्के आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. मग मुलाचं संगोपन करताना ती एकटी आहे की आई आणि वडील एकत्र येऊन मुलाला वाढवतात याने फार फरक पडत नाही. जेव्हा तिच्या मुलाचा प्रश्न येतो तेव्हा ती नेहमी त्याच्या चांगल्यासाठीच धडपडताना, मेहनत घेताना दिसते,’ असं तिने सांगितलं. जेनेलियाने कायमच हिंदीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांतूनही भूमिका करण्यात सातत्य ठेवलं आहे. लवकरच तिचा ‘ज्युनियर’ नामक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर मात्र मराठी चित्रपटांच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही तिने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Love of marathi movies film industry actress genelia deshmukh ysh

First published on: 23-07-2023 at 03:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×