जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. आतापर्यंत या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळेच हा शो लवकरच ३०० भागांचा टप्पा गाठणार आहे. विशेष म्हणजे या खास दिवशी सई आणि प्रसाद एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक सध्या या कार्यक्रमाच्या परिक्षकपदी आहेत. मात्र, यावेळी तेदेखील विनोदवीरांमध्ये सहभागी होत एक धमाकेदार स्किट सादर करणार आहेत.

समीर, विशाखा, प्रसाद खांडेकर आणि निखिल बने यांच्या स्कीटमध्ये सई आणि प्रसाद हेही सहभागी होणार आहेत. इतिहास पोटतिडकीने समजावून सांगणारा गाईड समीर, कुटुंबासह फिरायला आलेले प्रसाद खांडेकर, निखिल बने आणि विशाखा यांच्या या सहलीमध्ये प्रसाद आणि सई हेही दांपत्य म्हणून सहभागी होणार आहेत. या सगळ्या कलाकाराचं रसायन चांगलंच जमून आलं आहे. हे सादरीकरण प्रेक्षकांना कसं वाटतं, हे बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.