Mahavatar Narsimha Box Office Collection Day 17: अश्विन कुमार दिग्दर्शित पौराणिक अ‍ॅनिमेटेड चित्रपट ‘महावतार नरसिम्हा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने तिसऱ्या रविवारी जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. रक्षाबंधनाच्या वीकेंडला या चित्रपटाने भारतात १५० कोटी रुपयांचा डप्पा ओलांडला. तर चित्रपटाची जगभरातील कमाई २०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

‘महावतार नरसिम्हा’ चित्रपटाचे यश आश्चर्यकारक आहे. हा चित्रपट इतकी दमदार कमाई करेल, अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. कारण पहिल्या दिवशी या चित्रपटाने पाचही भाषांमध्ये फक्त १.७५ कोटी रुपये कमावले होते. पण चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं आणि नंतर सिनेमाच्या कमाईत हळुहळू वाढ झाली. भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराच्या या पौराणिक कथेने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.

‘महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा पहिला चित्रपट ‘महावतार नरसिम्हा’चे बजेट ४० कोटी रुपये आहे. कन्नड तसेच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १७ दिवसांत केवळ हिंदी भाषेतून १२६.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोणत्याही अॅनिमेटेड चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे.

महावतार नरसिम्हाचे १७ दिवसांचे कलेक्शन

महावतार नरसिम्हाने पहिल्या आठवड्यात ४४.७५ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या आठवड्यात ७३.४ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाने १७ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी तब्बल २३.५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन १६९.६५ कोटी रुपये झाले आहे. महावतार नरसिम्हाची जगभरातील कमाई २१३ कोटी रुपये झाली आहे.

‘महावतार नरसिम्हा’चे कलेक्शन ज्या वेगाने वाढतंय ते पाहता हा चित्रपट लवकरच ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. १४ ऑगस्ट रोजी ‘वॉर २’ आणि ‘कुली’ रिलीज होणार आहेत. तो पर्यंत, ‘महावतार नरसिम्हा’ला बॉक्स ऑफिसवर टक्कर देतील, असे कोणतेही चित्रपट थिएटरमध्ये नाही. त्यामुळे या चित्रपटाला त्याचा फायदा होईल, असं दिसतंय.