महेश मांजरेकर हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक व लेखक आहेत. त्यांनी आजवर विविध धाटणीचे विषय चित्रपट व नाटकांच्या माध्यमातून मांडले आहेत. सध्या ते ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र झाले आहेत. त्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिद्धार्थ बोडके हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर त्यामध्ये गौरी इंगवले व मंगेश देसाई हेदेखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.
महेश मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यग्र असले तरी आता लवकरच ते एका दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.अभिनेते कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ठग लाइफ’ या चित्रपटात महेश मांजरेकरही झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चित्रपटात महेश मांजरेकर खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे.
‘ठग लाइफ’ या चित्रपटात कमल हासन, महेश मांजरेकर, त्रिशा कृष्णन हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम दिग्दर्शित ‘ठग लाइफ’ हा चित्रपट ५ जुलै रोजी चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघता, चित्रपटात भरपूर अॅक्शन, ड्रामा पाहायला मिळणार आहे.
महेश मांजरेकर यांनी यापूर्वीसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटांमधून काम केलं आहे. ‘कथा कांचीकी मनम इंतिकी’, ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटांमध्येही महेश यांनी काम केलं आहे. महेश यांनी फक्त दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर अभिनेता म्हणूनही काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अशातच आता लवकरच ते रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. बुधवारी (२१ मे) या चित्रपटातील कलाकारांची नावं जाहीर करण्यात आली. पण, महेश मांजरेकर यामध्ये नेमकी कोणती भूमिका साकारणार आहेत याची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, महेश मांजरेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘देवमाणूस’ या चित्रपटात झळकले होते. यापूर्वी ते ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटातही झळकले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी स्वत: केलं असून, यात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचंही प्रेक्षक, तसेच चित्रपट समीक्षकांनी कौतुक केलं. त्याव्यतिरिक्त रंगभूमीवरही महेश मांजरेकर लिखित व दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ हे नाटक सुरू आहे. त्यामध्ये अभिनेत्री ऊर्मिला कोठारे, विराजस कुलकर्णी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.