Dileep Sankar Passes Away : मल्याळम अभिनेता दिलीप शंकर आज २९ डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरममधील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून चार दिवसांपूर्वी त्याने हॉटेलमध्ये चेक इन केले होते, असं अहवालात म्हटलं आहे.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की गेल्या दोन दिवसांपासून तो त्याच्या खोलीतून बाहेर आला नव्हता. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने आम्ही त्याची खोली उघडली. त्याची खोली उघडताच आम्हाला त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना तत्काळ कळवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, खोलीची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आली आहे.

दिलीपच्या सहकलाकारांनी त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला भेटण्याकरता ते हॉटेलमध्ये जात असतानाच त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली.

हेही वाचा >> अभिनेते नासर यांनी मुलाची स्मृती पुन्हा यावी यासाठी दाखवले ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारचे सिनेमे, मुलाच्या अपघाताचा प्रसंग सांगत, म्हणाले…

मालिकेचे दिग्दर्शक काय म्हणाले?

दिलीप शंकर एर्नाकुलममध्ये राहत होता. मनोरमा ऑनलाईननुसार, ज्या मालिकेत तो काम करत होता त्याचे दिग्दर्शक मनोज म्हणाले की, शूटिंगमध्ये दोन दिवसांचा ब्रेक होता. त्यामुळे त्याने हॉटेल बुक केले होते. त्या काळात त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. पण त्याने आमच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. तसंच, तो आरोग्याच्या समस्यांशीही सामना करत होता.

त्याची मैत्रीण आणि सहकारी सीमा नायरने सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे. तिने म्हटलंय की, “तू मला पाच दिवसांपूर्वी कॉल केला नव्हता का.. माझं डोकं दुखत होतं, त्यामुळे मी बोलू शकले नाही. आता एका पत्रकाराने मला फोन केल्यावर तुझ्याबद्दल कळलंल. दिलीप तुला काय झालंय. काय लिहावं ते कळत नाहीय.”