२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला जवळपास १७ वर्षे पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात घडलेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक लोक यात गंभीर जखमी झाले होते. यात भाजपा नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप होते.
याप्रकरणी ३१ जुलै रोजी आलेल्या निकालात सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालय विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) द्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. न्यायालयाने केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. या घटनेवर आता लवकरच चित्रपट येणार आहे. ‘मालेगाव फाईल्स’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.
‘मालेगाव फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘माय फ्रेंड गणेशा’ चित्रपट फेम राजीव एस. रुईया करणार असून, साहिल सेठ यांच्या सिनेडस्ट १८ फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली त्याची निर्मिती होणार आहे. सध्या या चित्रपटाची पूर्वतयारी टप्प्यात असून, कलाकार व तांत्रिक टीमबाबतची माहिती अद्याप उघड झालेली नाही.
फ्री प्रेस जर्नलनुसार, प्रेस नोटमध्ये चित्रपट निर्मात्यांनी सांगितले आहे की, हा चित्रपट २००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या स्फोटांची एक हृदयस्पर्शी आणि खिळवून ठेवणारी मांडणी या चित्रपटाद्वारे करण्यात येणार आहे. ही एक अशी दु:खद घटना होती, ज्याचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आणि अनेक वर्षे या घटनेबद्दलची भावनिक व कायदेशीर लढाई सुरू राहिली.”
तसंच याबद्दल राजीव रुईया म्हणाले, “हे फक्त बॉम्बस्फोटाचे प्रकरण नाही, तर या घटनेचा आजवरचा शोध आणि आरोपी व पीडित कुटुंबांनी भोगलेली मानसिक व कायदेशीर घुसमट आहे. या चित्रपटातून हे सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘मालेगाव फाईल्स’ या वास्तव घटनेला पडद्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
ANI शी बोलताना रुईया यांनी सांगितले की, चित्रपट खऱ्या ठिकाणीच चित्रित केला जाणार असून तो सखोल संशोधनावर आधारित असेल. “आमची लेखकांची टीम यावर काम करत आहे. हा अतिशय संवेदनशील विषय आहे, त्यामुळे प्रत्येक बाबीचे बारकाईने निरीक्षण आवश्यक आहे. सध्या याबद्दलचा अभ्यास सुरू आहे. ९९ टक्के शूटिंग प्रत्यक्ष ठिकाणीच होईल, त्यामुळे लवकरच ठिकाणांची पाहणी करणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मालेगाव फाईल्स’ हा चित्रपट तपास, अहवाल, न्यायालयातील दस्ताऐवज आणि प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असणार आहे. यावर्षीच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, येत्या काही महिन्यांत याबद्दलची अधिक माहिती जाहीर केली जाणार आहे.