कलाविश्वात काम करताना अनेक कलाकारांवर चांगले-वाईट प्रसंग येत असतात. अभिनेत्रींच्या वाटेला येणारे असे वाईट प्रसंग अधिकच असतात. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, सिनेइंडस्ट्री आणि राजकारणाचा फार जवळचा संबंध राहिला आहे. अनेक कलाकार आणि राजकारणी नेते यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण, एका प्रसिद्ध अभिनेत्रीला एका राजकीय नेत्याकडून मात्र वाईट अनुभव आला आहे.

आम्ही बोलत आहोत मल्याळम अभिनेत्री रिनी एन जॉर्जबद्दल. तिला एका राजकीय नेत्याने अश्लील मेसेज आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. केरळमधील अभिनेत्री रिनी जॉर्जने एका युवा नेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिने या नेत्यावर आरोप केला आहे की तो तिला अश्लील मेसेज पाठवत होता आणि साडेतीन वर्षे तिच्याशी अनुचित वर्तन करत होता. रिनीने त्या नेत्याचं नाव सांगितलं नाही, मात्र त्याच्या पक्षाच्या वरिष्ठांना याबाबत सांगूनही काहीच उपयोग झाला नसल्याचं तिने म्हटलं.

रिनी जॉर्जने नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती राजकीय नेत्याबाबत बोलली आहे. ती म्हणाली की, त्या नेत्याने तिला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्याची ऑफरही दिली होती. रिनी म्हणाली की, तिने त्या नेत्याला अनेक वेळा इशारा दिला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्याच्याबद्दल तक्रारही केली, परंतु तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही आणि त्याचे वर्तन बदलले नाही. वारंवार विनंती करूनही तिने नेत्याची ओळख उघड केली नाही. रिनी म्हणाली, ‘त्या नेत्याने मला अश्लील मेसेज पाठवले आणि मला एका विशिष्ट ठिकाणी भेटण्यास सांगितले. मी त्याला थांबवले आणि धमकी दिली तेव्हा त्याने मला आव्हान दिले आणि म्हटले, “जा, ज्याला सांगायचे आहे त्याला सांग, कोणालाही फरक पडत नाही,” असं रिनीने सांगितलं.

तिने असेही सांगितले की, ती सोशल मीडियाद्वारे त्या नेत्याच्या संपर्कात आली होती आणि हे सर्व सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरू झाले. त्या नेत्याने तिला शेवटचा मेसेज फेब्रुवारी २०२५ मध्ये केला होता. रिनी म्हणते की, जेव्हा नेत्याने तिला पहिल्यांदा हॉटेलमध्ये बोलावण्याबद्दल बोलले तेव्हा तिने त्याचा तीव्र विरोध केला. पण, काही दिवसांनी पुन्हा तेच सुरू झालं. रिनी पुढे म्हणाली, ‘जेव्हा हे सर्व घडले, तेव्हा मला आशा होती की पक्षातील वरिष्ठ लोक मला मदत करतील. परंतु, असे काहीही घडले नाही. माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले. आता मला असे वाटू लागले आहे की माझ्या मनात त्या पक्षाची जी प्रतिमा होती ती पूर्णपणे तुटली आहे.”