MAMI Mumbai Film Festival Update : मुंबईमधील सिनेवर्तुळात प्रतिष्ठेचा मानला जाणारा चित्रपट महोत्सव म्हणजे, ‘मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ अर्थात ‘MAMI मुंबई फिल्म्स फेस्टिव्हल’. दरवर्षी हा फेस्टिव्हल मोठ्या दिमाखात पार पडतो. मात्र यंदाचा, २०२५ चा ‘MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हल’ रद्द करण्यात आला आहे, अशी अधिकृत माहिती फेस्टिव्हलचे संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी दिली आहे.

इन्स्टाग्रामवरील शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये असं म्हटलंय, “आम्हाला हे कळवण्यात खंत वाटत आहे की, २०२५ मधील MAMI फिल्म फेस्टिव्हल होणार नाही. या फेस्टिव्हलची नव्या टीमसह पुनर्रचना करण्यात येत आहे, जेणेकरून हा फेस्टिव्हल भारतासह जगभरातील स्वतंत्र आणि प्रादेशिक सिनेमांचा दर्जेदार मंच म्हणून पुन्हा उभा राहील.”

याबद्दल महोत्सवाचे संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “हा फेस्टिव्हल म्हणजे केवळ चित्रपट दाखवण्याचा कार्यक्रम नाही, तर त्याला शहराशी जोडणं, प्रेक्षकांशी संवाद साधणं आणि स्वतंत्र निर्मिती करणार्‍यांना व्यासपीठ देणं हे आमचं उद्दिष्ट आहे.”

२०२४ मध्ये MAMI फेस्टिव्हल रिगल सिनेमा आणि पीव्हीआर जुहू इथे झाला होता. याआधी अनेक वर्षे प्रायोजक (स्पॉन्सर) असलेल्या जिओ (Jio) ने आपला पाठिंबा काढल्यानंतर आर्थिक बळ कमी होतं आणि अनेक गोष्टी नीट सांभाळाव्या लागल्या होत्या, असं डुंगरपूर यांनी सांगितलं. “फंडिंग ही अडचण नसून, आधीच्या काही प्रशासकीय व धोरणात्मक समस्या आहेत, ज्या सोडवण्यासाठी वेळ घेतला जात आहे. फेस्टिव्हल अधिक प्रभावी होईल आणि त्याचं व्यवस्थापन सुधारेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत” असंही ते म्हणाले.

यानंतर ते म्हणतात, “डॉक्युमेंट्री आणि स्वतंत्र सिनेमा यात भेद करता येत नाही. उलट, आम्ही स्वतंत्र सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळवून देण्यासाठी काम करत आहोत. MAMI फेस्टिव्हलची टीम २०२६ मध्ये नव्या उमेदीने आणि नव्या रूपात परतण्यास सज्ज आहे. हे फेस्टिव्हल लोकांसाठी असावं, असं आम्हाला वाटतं. आम्ही मुंबईत आहोत – ही ओळख फेस्टिव्हलच्या लोगोमध्ये आणि संपूर्ण सादरीकरणात दिसेल. याबद्दल अडचणी होत्या, पण आता आम्ही अधिक सक्षमपणे परतणार आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १९९७ पासून मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) मार्फत आयोजित होणारा हा फेस्टिव्हल, दक्षिण आशियातील एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव मानला जातो. मात्र तो यंदाच्या वर्षी होणार नसून २०२६ मधील नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. सध्या टीम त्यावर काम करत आहे असं सांगण्यात आलं आहे.