Manasi Naik and Pradeep Kharera Divorce: मराठी अभिनेत्री मानसी नाईक मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर आता मानसी नाईकने मौन सोडलं असून घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचं कबुल केलं आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर आणि एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केल्यानंतर त्याच्या घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर आता मानसीने पती प्रदीप खरेरापासून वेगळं झाल्याच्या चर्चांची पुष्टी करत यावर स्पष्टीकरणही दिलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ती म्हणाली, “घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.”

आणखी वाचा- “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

मानसी नाईक पुढे म्हणाली, “नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत आणि हे सगळं खूपच वेगात घडलं. पण आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं. आणि मी लग्न केलं. अर्थात तेही सर्व खूपच घाईघाईत झालं. मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकलं. या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं.”

मानसी नाईक या मुलाखतीत म्हणाली, “मला आता या सगळ्या गोष्टी मागे सोडून माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. सध्या एक कलाकार म्हणून माझ्यासाठी माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, मी स्वतः आणि माझे प्रेक्षक, चाहते हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला वाटतं आता मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. कधी कधी तुमचा माणसांवरील विश्वास उडतो आणि माझ्याबाबतीत हेच घडलं आहे. मला भावनिकदृष्ट्या आधाराची गरज होती. पण दुर्दैवाने त्या नात्यात असं काहीच घडलं नाही.”

आणखी वाचा- “तिला कंट्रोल…” दीपाली सय्यद यांनी मानसी नाईक-प्रदीपच्या लग्नाबद्दल केलेला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी पुढे म्हणाली, “मी पुण्यात वाढले. त्यामुळे ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याला नेहमीच पाठिंबा देता यावर माझा विश्वास आहे. मी माझं काम केलं. पण जर एकाच व्यक्तीला कायम समर्थन मिळतंय आणि दुसऱ्या व्यक्तीला ते मिळत नसेल तर मला वाटतं अशा नात्यातून बाहेर पडणं नेहमीच चांगलं. आजकाल बरेच लोक मानसिक आरोग्याबाबत बोलताना दिसतात. जोडीदाराने एकामेकांना कसं समजून घ्यावं, एकमेकांशी कसं बोलावं याबद्दल सांगत असतात. पण जर तुमच्या नात्यात हा समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. अशा नात्यातून बाहेर पडा आणि पुढे जा.”