Manika Vishwakarma Wins Miss Universe India 2025: राजस्थानमधील जयपूर येथे मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची विजेती मनिका विश्वकर्मा ठरली आहे. २२ वर्षांची मनिका विश्वकर्मा मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ ठरली आहे. यापूर्वी मनिकाने मिस युनिव्हर्स राजस्थान २०२४ चा खिताब जिंकला होता. आता मिस युनिव्हर्स इंडिया ठरल्यानंतर ती ७४ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करेल.

उत्तर प्रदेशातील तान्या शर्मा पहिली रनर-अप, हरियाणाची मेहक धिंग्रा आणि अमिषी कौशिक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या रनर-अप ठरल्या. विजेती मनिका विश्वकर्मा ही मूळची राजस्थानमधील गंगानगर येथील रहिवासी आहे आणि दिल्लीमध्ये मॉडेलिंग करते. मनिका अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे.

२०२४ मध्ये मिस युनिव्हर्स राजस्थान ही स्पर्धा जिंकल्यानंतर मनिका विश्वकर्माने मॉडेलिंग करायचं ठरवलं. तिने दिल्लीमध्ये मॉडेलिंग सुरू केले. आता २०२५ मध्ये मिस युनिव्हर्स इंडियाचा मुकुट जिंकल्यानंतर ती या वर्षाच्या अखेरीस थायलंडमध्ये होणाऱ्या ७४ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. या जागतिक व्यासपीठावर १३० देशांतील तरुणी आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करतील.

पाहा व्हिडीओ-

मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ ही स्पर्धा जिंकल्यानंतर, मनिका विश्वकर्माने आनंद व्यक्त केला आहे. हा एक खूप सुंदर अनुभव असल्याची भावना तिने व्यक्त केली. मनिकाने तिच्या शिक्षकांचे, मार्गदर्शकांचे, पालकांचे, मित्रांचे आणि तिच्या कुटुंबाचे पाठिंब्यासाठी आभार मानले. आता जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि मिस युनिव्हर्सचा मुकुट मायदेशी आणणे हे ध्येय असल्याचे मनिकाने सांगितले.

मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ स्पर्धेच्या परीक्षकांमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला, मिस युनिव्हर्स इंडियाचे मालक निखिल आनंद, प्रसिद्ध बॉलीवूड स्टायलिस्ट अ‍ॅशले रोबेलो आणि प्रसिद्ध बॉलिवूड लेखक-दिग्दर्शक फरहाद सामजी यांचा समावेश होता.