IPopstar Singer Radhika Bhide : गेल्या काही दिवसांपासून “मन धावतया तुझ्याच मागं, डोलतया तुझ्याचसाठी…” हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं आयपॉपस्टार या शोमध्ये मराठमोळ्या राधिका भिडेने गायलं आहे. तिचा सुमधूर आवाज ऐकून परीक्षकांचे डोळे सुद्धा पाणावल्याचं पाहायला मिळालं. ही राधिका भिडे आहे तरी कोण तिच्याबद्दल जाणून घेऊयात…
राधिका भिडे ही मूळची रत्नागिरीची असून गेल्या दोन वर्षांपासून ती मुंबईत राहते. राधिका गेल्या पाच वर्षांपासून संगीत दिग्दर्शक म्हणून काम करतेय. अजय-अतुल, ए आर रेहमान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात संगीत दिग्दर्शक म्हणून खूप चांगलं काम करायचं असं राधिकाचं स्वप्न आहे.
राधिका संगीत दिग्दर्शक, निर्माती, गीतकार आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. लहान वयातच तिने संगीत क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. काही दिवसांपूर्वी ती आयपॉपस्टार (IPopstar ) या शोमध्ये सहभागी झाली. या शोची संकल्पना अन्य शोजपेक्षा बरीच वेगळी आहे. यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्वत: लिहिलेली आणि कंपोझ केलेली गाणी सादर करावी लागतात.
राधिकाने “मन धावतया तुझ्याच मागं…” हे तिचं गाणं सादर करताच परीक्षकांचे डोळे सुद्धा पाणावले होते. एकाही परीक्षकाला मराठी भाषा समजत नव्हती पण, राधिकाच्या सुमधूर आवाजाने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. हे गाणं सादर करताना गायिकेने जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. तिच्या या लूकचं परीक्षक आस्था गिलने विशेष कौतुक केलं.
आयपॉपस्टार हा शो MX प्लेयरवर ऑन एअर होताच राधिकाचं गाणं सर्वत्र तुफान व्हायरल झालं आहे. मराठी कलाकारांनी सुद्धा राधिकावर कौतुकाचा वर्षाव कला आहे. राधिका ही शमिका भिडेची धाकटी बहीण आहे. शमिका भिडे ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमुळे नावारुपाला आली होती. राधिका-शमिकाने अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र परफॉर्म सुद्धा केलं आहे.
दरम्यान, राधिका सहभागी झालेल्या आयपॉपस्टार या शोमध्येच गायक रोहित राऊत सुद्धा सहभागी झाला आहे. त्याच्याही गाण्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
