आसाम आणि चीनच्या सीमेवरील तवांग भागात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात “भारतीय सैन्याची धुलाई” केल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावरुन सुरू झालेला वाद अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये. आता भोपाळ येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक आणि गीतकार मनोज मुंतशीर यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा समाचार घेताना वादग्रस्त विधान केलं आहे. राहुल गांधी यांनी भारतीय लष्करातील सैनिकांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मनोज मुंतशीर यांनी चाणक्यनितीचा संदर्भ दिला. “विदेशी मातेच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त असू शकत नाही. समस्या डीएनएमध्ये आहे,” असं विधान मनोज मुंतशीर यांनी केलं.
मनोज मुंतशीर सोमवारी संध्याकाळी भोपाळच्या रविंद्र भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मुंतशीर यांनी राहुल गांधींच्या भारतीय लष्करातील सैनिकांबद्दल केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. मुंतशीर म्हणाले, “सरदार भगतसिंग यांच्याबद्दल बोलत असताना माझ्या लक्षात आलं की, जगात कुठेही गेलात तरी प्रत्येक देशामधील शैक्षणिक अभ्यासक्रमात देशभक्ती हा एक विषय असतो. देश प्रेम शिकवावं लागतं तिथल्या मुलांना, की पाहा तुमच्या आजोबा-पणजोबांनी हे केलं आहे. तुम्हीही तुमच्या देशावर प्रेम करा.”
आणखी वाचा-“तो खिलजीसारखा दिसला तर गैर काय?” मनोज मुंतशीर यांचं ‘आदिपुरुष’मधील रावणाला समर्थन
मनोज मुंतशीर पुढे म्हणाले, “संपूर्ण जगात भारत असा एकमेव देश आहे जिथे देशभक्ती, देशप्रेम शिकवावं लागत नाही. आपण जन्मत:च आपल्या हृदयात देशभक्ती घेऊन येतो. आता आपण चीनलाही पळवून लावलं. पण जेव्हा देशातील एक बेजबाबदार नेता, ‘आपल्या देशाचे सैनिक चीनच्या सैनिकांकडून मार खात आहेत’ असं वक्तव्य करतो तेव्हा खूप दुःख होतं. लष्करातील जवानांसाठी एवढ्या लाजिरवाण्या भाषेचा वापर केला जातो. एक नेता असं कसं म्हणू शकतो की, आपल्या सैनिकांनी मार खाल्ला. मी चाणक्यनिती वाचलं आहे. तुम्हीही वाचलं असेलच त्यातील एक वाक्य मला इथे सांगावेसे वाटते. विदेशी मातेच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीच राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, असं चाणक्य यात म्हणाले आहेत. त्यामुळे समस्या त्यांच्या (त्या नेत्याच्या) डीएनएची आहे. तुम्ही आणि आम्ही याबाबत काहीच करू शकत नाही.”
“एकीकडे तुमचा-माझा डीएनए आहे. आपला डीएनए आपल्याला काय शिकवतो? आपण भारत देशाला माता म्हणतो. जर आपण भारतमाता म्हणत असू तर आईवर प्रेम करायला आपल्याला शिकवावं लागत नाही. कोणत्याही शाळेत भारतमातेवर प्रेम कसं करावं हे शिकवलं जात नाही. भारतमाता म्हटलं की आपण आयुष्यभरासाठी त्या मातीसाठी स्वतःला वाहून घेतो. त्या मातीचे ऋणी राहतो. आपल्याला देशभक्त शिकवली जात नाही आणि शिकवावी लागतही नाही,” असंही मुंतशीर म्हणाले.