Marathi Actor Post After Thackeray Brothers Reunite : पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ५ जुलै रोजी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या विजयी मेळाव्यासाठी मराठी जनसमुदाय वरळीतीत दाखल झाला होता. या विजयी मिळाव्यात दोन दशकांपासूनची ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची आतुरताही संपली.

मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. केवळ कार्यकर्तेच नव्हे तर काही मराठी कलाकारही या दोघांना एकत्र आल्याचे पाहून आनंदित झाले आहेत. हेमांगी कवी, शिवानी सुर्वे, प्रथमेश परब, किरण माने, रुचिरा जाधव व धनंजय पोवार या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या.

अशातच मराठी अभिनेता प्रणव रावराणेने ठाकरे बंधू एकत्र येताच सोशल मीडिया पोस्ट शेअर करीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यासह त्याने त्याच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. अभिनेत्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यातील काही खास फोटो शेअर करीत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये प्रणव म्हणतो, “साधारण २० वर्षांपूर्वीचा दिवस आठवला; जेव्हा हे भाऊ वेगळे झाले होते. तेव्हा मी काळाचौकीला राहायचो म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात. कोणाचाच विश्वास बसत नव्हता की, ठाकरे बंधू वेगळे होत आहेत. काही वेळेनंतर टीव्हीवर राजसाहेबांचं भाषण लाइव्ह सुरू झालं. मी, माझी आई, बहीण, शेजारच्या काकी, त्यांचा मुलगा, शेजारची शुभांगी ताई, तिची आई, भाऊ, वहिनी असे सगळे जमले. गिरणगावात सुख-दुःखात कमीत कमी एवढी माणसं तरी लगेच जमतातच.”

पुढे तो म्हणतो, “राजसाहेबांनी जाहीर केले ‘मी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा देतो आहे’ आणि आमच्या घरातल्या सगळ्या बायका ढसाढसा रडायला लागल्या. जणू काही आपल्याच घरात ही फूट पडली आहे. तेव्हा कळलं, की आपण या कुटुंबाशी किती जोडलेलो आहोत. पुन्हा हे दोघे एकत्र येतील, बाळासाहेब त्यांना एकत्र आणतील ही भाबडी आशा होतीच; पण ते घडलं नाही.”

त्यानंतर प्रणवनं सांगितलं, “हे दोघ एकत्र यावेत म्हणून काही कार्यकर्ते, शिवसैनिक कृष्णकुंजवर गेले होते. त्यात माझे वडीलही गेले होते; पण ते मला कधी समजावू शकले नाहीत, ते त्यांना काय समजावणार आणि जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते शिवसैनिकांना काय जमणार होतं म्हणा. त्यांनतरच्या प्रत्येक निवडणुकीत मराठी माणसाचं झालेलं नुकसान बघून नेहमी वाटायचं, या भावांनी एकत्र यायला पाहिजे. असं मलाच काय; पण आपल्या सख्ख्या भावाशी न बोलणाऱ्या भावांनासुद्धा हेच वाटायचं. म्हणून तेसुद्धा हे भाऊ एकत्र येण्यासाठी प्रार्थना करताना मी पाहिले आहेत.”

त्यानंतर प्रणवनं सांगितलं, “अखेर तो दिवस आला जेव्हा हे भाऊ एकत्र आले आणि असं वाटलं २० वर्षांनी पूर्वी माझ्या घरात माझ्या लोकांसारखी महाराष्ट्रात रडणारी अनेक लोकं आनंदानं हसले असतील. हे दृश्य पाहून अनेक जण सुखावले असतील. स्वर्गीय बाळासाहेबही सुखावले असतील. आता काही दिवस का असेना, आम्हा सामान्य मराठी माणसाला एक वेगळाच आत्मविश्वास येणार. ते नाही का क्रिकेट खेळताना कितीही मोठं लक्ष्य असलं तरी अजून सचिन आहे रे… किंवा विराट खेळतो आहे ना बस… आपण जिंकणार तसं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर त्यानं म्हटलंय, “आताही तसंच वाटत आहे की, आपण जिंकणार… फक्त एकच विनंती आहे, अमराठी उद्योजकांना किंवा लोकांना मराठीचे धडे देण्यापेक्षा… मराठी माणसाला उद्योजक होण्याचे धडे द्या. बाकीचं आपसूकच होईल. अर्थात, हा माझा विचार आहे. असो! आपण मात्र हा दिवस घरात गोडाचं जेवण करून साजरा केला. कारण- पाकीट मिळायला मी काही राजकीय कार्यकर्ता नाही. जय महाराष्ट्र!”