Sumeet Raghvan Shares Mumbai Traffic Video : मुंबईतील वाहतूक कोंडी हा सध्या ऐरणीवरचा प्रश्न आहे. मुंबई-पुणेसारख्या शहरांत गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. या वाहतूक कोंडीला सामान्य माणूस वैतागला आहेच. पण अनेक कलाकार मंडळीसुद्धा या वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत.
मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीबद्दल ते त्यांच्या सोशल मीडियाद्वारे आपली मतंही व्यक्त करतात. अशातच मराठी अभिनेता सुमीत राघवनने मुंबईतील वाहतूक कोंडीबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने स्वत: मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची भीषण परिस्थिती दाखवली आहे. तसंच या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने प्रश्नही उपस्थित केले आहे. सुमीतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये एक शेंगदाणा विक्रेता पहायला मिळत आहे, ज्याबद्दल सुमीत राघवन म्हणतो, “हा आता ब्रिजवर सुद्धा दिसायला लागलाय. काय कमाल आहे.” तसंच या व्हिडीओच्या सुरूवातीला त्यांनी ‘ब्रिजवरसुद्धा शेंगदाणे विकणारा दिसला की समजून जा…’ आणि ‘सावळा गोंधळ’ असं लिहिलं आहे.
पुढे व्हिडीओमधून त्याने ब्रिजवरील प्रचंड वाहतूक कोंडीची दृश्ये दाखवले आहेत. यासह ते असं म्हणतात, “बांद्रावरुन सांताक्रूझच्या दिशेने उतरणारा पूल, त्यावरून जे ट्रॅफिक खाली उतरतं ते, तसंच ब्रिजवरील खाली उतरणारे ट्रॅफिक आणि सांताक्रूझ स्टेशनच्या दिशेने खालून येणारं ट्रॅफिक… असे तीन प्रवाह एकाच ठिकाणी येतात. तर मला अधिकाऱ्यांना, एमएमआरडीए आणि वाहतूक विभागाला विचारायचंय… तुम्ही बसून ठरवत नाही का? की जर तीन प्रवाह एकाच ठिकाणी आले, तर तिकडे गोंधळच होणार आहे. कॉमन सेन्स असतो ना? म्हणजे काय फायदा झाला करोडो रुपये खर्च करून?”
यानंतर त्याने व्हिडीओमध्ये पुढे ब्रिजच्या भिंतीवर थुकलं असल्याचं दृश्य दाखवत “इकडे थुंकूनसुद्धा ठेवलं आहे. बरं का? सामान्य माणूससुद्धा काही कमी नाही” असं म्हटलंय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ते लिहितात, “कॉमन सेन्सचा दुष्काळ. आनंदी आनंद गडे.. इकडे तिकडे चोहीकडे.. ४५ मिनिटं लागली हा नवीन ब्रिज पार करायला…”
सुमीत राघवन इन्स्टाग्राम व्हिडीओ
सुमीत राघवन यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये अनेकानी त्यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, सुमीत राघवन कायमच आपलं स्पष्ट आणि रोखठोक मत मांडताना दिसतो. अशातच त्यानं पुन्हा एकदा वाहतूक कोंडीबद्दल व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.