Mukta Barve On Her Curly Hair : आजपर्यंत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने वेगवेगळ्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या तिन्ही माध्यमांमध्ये मुक्ताला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
मुक्ता बर्वेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. वेगवेगळ्या गोष्टी तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. स्वतःच्या हिमतीवर मुक्ताने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.
मुक्ता बर्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. मुक्ता बर्वेने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या अनुभवातून सकारात्मक संदेश दिलाय. मुक्ता स्वतःच्या मूळ स्वरूपाचा स्वीकार करणे किती गरजेचे आहे, यावर बोलली आहे.
मुक्ता बर्वेच्या या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने एक कुरळे केसांचा आणि एक सरळ केसांचे फोटो शेअर केले आहेत. तिने या पोस्टला कॅप्शनदेखील दिलं आहे. तिने लिहिले, “एक गंमत सांगते, मला कित्ती तरी वर्ष हे माहीतच नव्हतं की माझे केस कुरुळे आहेत. मला वाटायचं माझे केस फार हट्टी, त्रासदायक आणि वाईट आहेत, जे कधीच मला हवे तसे, सगळ्यांचे असतात तसे दिसत नाहीत; त्यामुळे मी त्यांना प्रयत्न करून सरळ करायचे आणि ते कुरळे होऊन होऊन मला त्रास द्यायचे. पण, एक दिवस साक्षात्काराचा क्षण आला आणि आमच्यातलं भांडण संपलं.”
मुक्ता बर्वे पुढे म्हणते, “जर तुमचे केस कुरळे असतील तर त्यांच्याशी लढा देण्यात आयुष्य वाया घालवू नका. आता मी माझ्या कुरळ्या केसांचा अभिमानाने स्वीकार केला आहे. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकार करू शकलो, तर आपल्या आतला झगडाच संपून जातो. तुम्हाला काय वाटतं? आपण आहोत तसं स्वतःला स्वीकारावं की बदलावं? असा प्रश्नदेखील तिनं चाहत्यांना केलाय.
मुक्ता बर्वेने चित्रपटातल्या प्रत्येक भूमिका खूप चांगल्या पद्धतीने केल्या, त्यामुळेच तिच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक होतं. कित्येक वर्ष ती मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करतेय. तिचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. मुक्ताने वयाच्या १५ व्या वर्षी रत्नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात काम केले. त्यानंतर मुक्ताने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण, मुक्ता बर्वेला खरी ओळख ‘जोगवा’ या चित्रपटाने दिली. यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिने साकारलेली राधा रसिकांच्या पसंतीस उतरली. ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटात तिने साकारलेली भूमिका सगळ्यांनाच आवडली.
मुक्ता आणि स्वप्नील जोशी या जोडीचे प्रचंड चाहते आहेत. या जोडीने एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. सगळ्यात जास्त गाजणारा चित्रपट म्हणजे ‘मुंबई-पुणे-मुंबई’. या चित्रपटाचे आतापर्यंत ३ भाग आले आहेत. प्रेक्षक चौथ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुक्ता बर्वेच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची ‘नाच ग घुमा’ या चित्रपटात दिसली होती.