Marathi Actress Talk About Color Discrimination : मनोरंजन क्षेत्रात काम करताना अनेक कलाकारांना सावळ्या रंगामुळे भेदभावाला सामोरं जावं लागतं. अनेकदा गोऱ्या वर्णाच्या कलाकारांना मालिका किंवा सिनेमांत मुख्य भूमिकांसाठी विचारणा होते. मात्र सावळ्या रंगामुळे अनेक कलाकारांमध्ये टॅलेंट असूनही त्यांना डावललं जातं.

इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनी हा वर्णभेद सहन केला आहे. असाच वर्णभेदाचा सामना एका मराठी अभिनेत्रीला सहन करावा लागला होता. या अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमातही काम केलं. ‘नाग मेरे साथी’ या सिनेमातून वयाच्या चौथ्या वर्षी पल्लवी यांनी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.

पल्लवी जोशी यांनी मराठीत सूत्रसंचालन केलं आहे, विशेषतः ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या. अशातच नुकतंच त्यांनी वर्णभेदाचा सामना केल्याचा अनुभव सांगितला आहे. लवकरच त्यांचा ‘द बंगाल फाइल्स’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने नवभारतने त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी त्यांना रंग-रूपामुळे इंडस्ट्रीमध्ये कधी रिजेक्शनचा सामना करावा लागलाय का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत पल्लवी म्हणाल्या, “हो… फार पूर्वी असं झालं होतं. एकदा विवेक एका टीव्ही प्रोजेक्टसाठी मला कास्ट करणार होता, तेव्हा एका वरिष्ठ व्यक्तीने सांगितलं, “पल्लवीला कास्ट करू नको, ती काळी आहे.” यावर विवेकने हसून उत्तर दिलं, “मेकअप नावाची गोष्ट असते ना?”

पल्लवी जोशी इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर त्या म्हणतात, “ही मानसिकता अजूनही आहे. आपल्या देशात मूल जन्माला आलं की विचारतात, गोरं आहे की काळं? म्हणजे आपल्याला आजही गोऱ्या रंगाचं वेड आहे आणि फक्त वर्ण नव्हे, तर मुलगा आहे की मुलगी आहे हेही विचारलं जातं – म्हणजेच आपण वंशभेदी आणि लिंगभेदीही आहोत. ही समस्या आपल्यातच आहे, म्हणून जोपर्यंत ती सुधारत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही.”

दरम्यान, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ सिनेमात पल्लवी जोशी यांची महत्त्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या त्यांच्या लुकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. येत्या ५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘द बंगाल फाइल्स’ प्रदर्शित होणार आहे. यामध्ये पल्लवी जोशींसह मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि सिम्रत कौर या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत.