करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातली परिस्थिती सध्या गंभीर आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय यंत्रणा या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. तरीही प्रत्येक दिवशी करोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने नागरिकांसाठी सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये गर्दीची ठिकाणं टाळण्यापासून, परदेशातून आलेल्या व्यक्तींनी स्वतःला इतरांपासून वेगळं ठेवण्याची विनंती करण्यात आलेली आहे. सरकारी यंत्रणा वारंवार विनंती करत असतानाही मुंबई आणि लगतच्या परिसरामध्ये क्वारंटाईन केलेली संशयीत लोकं रस्त्यावर फिरताना-प्रवास करताना आढळली होती.
मराठी अभिनेत्री पर्ण पेठेने या सर्वांसाठी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. नुकत्याच अमेरिका दौऱ्यावरुन परतलेल्या पर्णने आपलं सामाजिक जबाबदारीचं भान ओळखत स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. भारतात आल्यापासून मी माझा नवरा, आई-बाबा, नातलग, मित्र-मैत्रिणी यांना भेटले नाहीये. माझ्या प्रिय व्यक्तींना माझ्यामुळे त्रास व्हावा असं मला वाटत नाही. तुम्हीली आपली जबाबदारी ओळखून वागा…अशा आशयाची फेसबूक पोस्ट पर्णने पोस्ट केली आहे.
दरम्यान, आजच्या दिवशी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून सर्व महत्वाची शहरं ही बंद राहणार आहे. अत्यंत गरजेचं असल्यास घरातून बाहेर पडा असं आवाहन सरकारी यंत्रणांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात करोनावर नियंत्रण मिळवण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.