काही दिवसांपूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी बीडमधल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधील भयंकर अनुभव सांगितला. अस्वच्छता आणि बाथरुमची भयाण अवस्था पाहून शरद पोंक्षेंनी खंत व्यक्त करत निषेध नोंदवला. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री स्पृहा जोशीने जालन्यातल्या नाट्यगृहाची दुरवस्था पाहून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सध्या रंगभूमीवर ‘पुरुष’ नाटक जोरदार सुरू आहे. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. जयवंत दळवी लिखित आणि राजन ताम्हणे दिग्दर्शित ‘पुरुष’ नाटकाचे सध्या ठिकठिकाणी दौरे सुरू आहेत. नुकताच स्पृहा जोशीने जालन्यातल्या नाट्यगृहाचा फोटो शेअर करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

स्पृहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये जालन्यातल्या नाट्यगृहात तुटलेल्या खुर्च्या दिसत आहेत. तसंच छप्परची अवस्था देखील अत्यंत वाईट झालेली पाहायला मिळत आहे. हे जालन्यातलं फुलंब्रीकर नाट्यगृह आहे. स्पृहाने या नाट्यगृहाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “हे आपल्या जालन्यातील फुलंब्रीकर नाट्यगृह आहे. काही वर्षांपासून याची खूप दुरवस्था झाली आहे. आपण सगळ्यांनी सरकारला विनंती करून या नाट्यगृहाच्या दुरुस्तीची मागणी करुया.” या फोटोवर स्पृहाने रागाचे, दुःखाचे इमोजी शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
स्पृहा जोशी इन्स्टाग्राम स्टोरी
स्पृहा जोशी इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, स्पृहा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या मराठी रंगभूमी गाजवताना दिसत आहे. तिचं ‘पुरुष’ नाटकासह ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाचा प्रेक्षकांला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी कविता सादर करतात. याशिवाय गेल्या वर्षी स्पृहा जोशी छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली. ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘सुख कळले’ मालिकेत ती झळकली होती. या मालिकेत स्पृहा जोशी अभिनेता सागर देशमुख, आशय कुलकर्णी अशा बऱ्याच कलाकारांबरोबर दिसली होती. पण सप्टेंबर २०२४मध्ये सुरू झालेली स्पृहाची ही मालिका अवघ्या पाच महिन्यात बंद झाली.