जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सध्या रंगभूमीवर ‘पुरुष’ नाटक जोरदार सुरू आहे. प्रेक्षकांचा या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या ठिकठिकाणी ‘पुरुष’ नाटकाचे दौरे सुरू आहेत. या दौऱ्यात ‘पुरुष’ नाटकातील कलाकार मजा-मस्ती करताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच या नाटकातील काही कलाकारांनी हुरडा पार्टी केली, याचा व्हिडीओ स्पृहा जोशीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

जयवंत दळवी लिखित आणि राजन ताम्हणे दिग्दर्शित ‘पुरुष’ नाटकात अभिनेत्री स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे पाहायला मिळतात. १६ फेब्रुवारीला ‘पुरुष’ नाटकाचा दौरा बीडमध्ये होता. तेव्हा कलाकारांनी हुरडा पार्टी केली.

अभिनेत्री स्पृहा जोशीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “नाटकाचा दौरा म्हणजे फक्त काम एके काम नाही. ती संधी असते वेगवेगळ्या जागा, ठिकाणं पाहायची…वेगवेगळ्या लोकांना भेटायची. आपल्याच टीम मधल्या मित्रांना आणखी जवळून ओळखायची. ‘पुरुष’ नाटकाचा आमचा मराठवाडा दौरा सुरू आहे. आम्ही सगळी बीड मधल्या अमृत हुरडा पार्टीला गेलो होतो. आमच्या @paithanesantosh ने सगळी व्यवस्था १ नंबर केली होती. व्हिडिओ मोठा आहे थोडा. पण अख्खा दिवस मावला नसता ३० सेकंदात…हा मिनी व्लॉग आवडला का कळवा कमेंट्समधे नक्की.”

या व्हिडीओमध्ये स्पृहा जोशी, अविनाश नारकर आणि इतर कलाकार मंडळी निवांत वेळ घालवताना दिसत आहे. कोणी क्रिकेट तर कोणी कॅरम खेळताना पाहायला मिळत आहे. तसंच बैलगाडीवरून सफर करतानादेखील कलाकार दिसत आहेत. त्यानंतर सर्वजण मस्त हुरडा पार्टी करत आहेत. स्पृहाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये १६ फेब्रुवारीला ‘पुरुष’ नाटकाचा प्रयोग झाला. पण या नाट्यगृहाचा अतिशय भयंकर अनुभव कलाकारांना आला. त्यामुळे नाटक संपल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी ही खंत व्यक्त केली. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.