हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा छळ केला जात होता. तिला मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. हा छळ सहन न झाल्यानेच तिने आयुष्य संपवलं. ही घटना ताजी असतानाच आता एका मराठी अभिनेत्रीनेही तिचा नवरा लग्नानंतर तिचा छळ कसा करत होता ते सांगितलं आहे. मॉडेल आणि अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने तिच्याबाबतीत झालेल्या घरगुती हिंसाचाराची आपबिती सांगितली आहे.
कोण आहे आरजू गोवित्रीकर?
आरजू गोवित्रीकर ही मॉडेल आणि अभिनेत्री आदिती गोवित्रीकरची सख्खी बहीण आहे. आरजूने २००१ मध्ये आलेल्या एका मल्याळम चित्रपटांतून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने ‘तुलसी’, ‘मेरे बाप, पहले आप’, ‘बागबान’ , ‘इट्स माय लाइफ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच सीआयडी, एक लडकी अंजानीसी, नागीन २ या टीव्ही मालिकांमध्येही ही आरजू दिसली आहे. आरजूने प्रेमविवाह केला होता. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही तिला नव्हती. २०१० मध्ये आरजूने सिद्धार्थ सबरवालशी प्रेमविवाह केला. आपल्या आयुष्याबाबत तिने अनेक स्वप्नं पाहिली होती. पण तिच्या नशिबी फक्त छळच आला. याबाबत एका मुलाखतीत तिने खुलासा केला आहे.

पतीकडून सात वर्षे हिंसाचार आणि छळ सहन केला-आरजू गोवित्रीकर
आरजूने व्यावसायिक सिद्धार्थ सबरवालशी लग्न केलं. या दोघांना मुलगा झाल्यानंतर सिद्धार्थने आरजूचा छळ सुरु केला. दारुच्या नशेत सिद्धार्थने मारहाण केली. तसंच तो माझ्या अंगावर थुंकायचा असं आरजूने २०२१ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. एवढंच नाही तो एकदा दारु पिऊन घरी आला त्याने मला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि बाथरुममध्ये ओढत नेलं. तिथेही मला मारहाण केली असाही आरोप आरजूने केला आहे. २०२१ ला ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आरजूने सांगितलं होतं की सिद्धार्थ एकदा घरी आला, त्याने माझी मान धरली आणि मला जोरात ओढलं. तसंच मला फ्लॅटच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्नही त्याने केला. मला कानशिलात ठेवून दिली, पोटात लाथ मारली. मी तेव्हा बाहेरही जाऊ शकत नव्हते कारण मला माझ्या जखमा कुणाला दाखवायच्या नव्हत्या. लग्नानंतर दोन वर्षे बरी गेली. पण सिद्धार्थने त्यानंतर माझ्यावर हात उचलण्यास सुरुवात केली असं आरजूने सांगितलं होतं.
आरजूने पतीवर केला होता विवाहबाह्य संबंधांचा आरोप
आरजूने तिचा पती सिद्धार्थ याचे विवाहबाह्य संबंध आहेत असाही आरोप केला होता. आरजूने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की त्याची एक रशियन प्रेयसी आहे. तो तिच्याशी सतत संपर्कात होता. २०१० ते २०१९ या कालावधीत सात वर्षे सिद्धार्थने छळ केला. त्यानंतर आम्ही घटस्फोट घेतला असं आरजूने सांगितलं होतं.