आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या आणि विविध पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या उषा जाधव या अभिनेत्रीने सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. कास्टिंग काऊच्या मुदद्याला अनुसरुन उषाने ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’च्या “Bollywoods Dark Secret”  या माहितीपटात स्वत:च्या अनुभवांचं कथन करत तिने काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. पण, या सर्व गोष्टी जाणूनबुजून न केल्याचं उषाने स्पष्ट केलं आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार याविषयी आपलं मत मांडताना उषा म्हणाली, ‘यातील कोणतीच गोष्ट ठरवून करण्यात आली नव्हती. मी स्वत:च्या अनुभवाचं कथन केलं असून त्या आठवणी आता मी बऱ्याच मागे सोडल्या आहेत. त्यावेळी मी या क्षेत्रात अगदीच नवीन होते, मला कोणत्याच गोष्टीचा अनुभव नव्हता. ज्या व्यक्तीने मला काम देण अपेक्षित होतं त्यानेच माझ्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली होती. आता मी त्या सर्व गोष्टी मागे सोडल्या आहेत’, असं उषा म्हणाली. त्या माहितीपटात माझ्यासोबत झालेल्या विनयभंगाच्या, कास्टिंग काऊच्या प्रसंगाविषयी कथन करण्यासाठी मला विचारण्यात आलं आणि मी ते केलं. या एका गोष्टीचा आपल्या कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो, याची तिला पूर्ण जाणीव आहे. सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे परिणाम माझ्या कारकिर्दीवर होऊ शकतील. पण, ही गोष्ट सर्वांसमोर येणं अतिशय महत्त्वाचं असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

वाचा : त्याने मला स्पर्श करण्यास सुरुवात केली अन्…, कास्टिंग काऊचबाबत मराठी अभिनेत्रींनी केला धक्कादायक खुलासा

जोपर्यंत कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावर जास्त वाच्यता होत नाही तोपर्यंत ही दुष्कृत्य थांबणार नाहीत, असं म्हणत आपण योग्य ते पाऊल उचलल्याचा आनंद तिने व्यक्त केला. त्याशिवाय मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या इतरांनीही त्यांच्यासोबत असा कोणता प्रसंग घडला असेल तर त्याविषयी इतरांना सांगावं, जेणेकरुन #MeToo ही मोहिम आपल्या मनोरंजन विश्वातही सक्रिय होऊन त्यातून सकारात्मक बदल घडतील असं आवाहन उषाने केलं.