झी मराठीवरील बस बाई बस हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील कतृत्ववान महिला सहभागी झाल्या होत्या. नुकतंच या कार्यक्रमात अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने हजेरी लावली. यावेळी त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटादरम्यान काम करण्याचा अनुभव सांगितला. यावेळी विशाखा सुभेदारला अभिनेत्री रेखासोबत काम करण्याचा अनुभव विचारला. त्यावर त्यांनी फार भावूक होत प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशाखा सुभेदारने सुपर नानी या हिंदी चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने अभिनेत्री रेखा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. यावेळी तुझा अनुभव कसा होता, असा प्रश्न तिला बस बाई बसच्या निमित्ताने विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला. तसेच रेखा यांनी तिला एक भेटवस्तूही दिली त्याबद्दलही तिने सांगितले.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

विशाखा सुभेदार नेमकं काय म्हणाली?

“रेखा जींसोबत काम करणं हा माझ्यासाठी आयुष्यातील फार मौल्यवान क्षण होता असं मी म्हणेन. ज्यांना आपण स्क्रीनवर बघतो, ज्यांचं काम, नाव, त्यांचं दिसणं, उभं राहणं या सर्व गोष्टींच्या मी लहानपणीपासून प्रेमात होते आणि ती बाई आपल्या बाजूला बसली, तिच्यासोबत आपल्याला काम करायचं. त्यावेळी तळपायची जी जमीन आहे ती कधीही सरकले आणि मी आता खाली जाईन असं वाटतं होतं. पण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं त्यामुळे जर मी माझा पहिला सीन चुकले असते तर मग कलाकार म्हणून माझं गणित चुकलं असतं.

आम्ही ९ दिवस एकत्र काम केलं. तर रेखाजी या अगदी मराठीत बोलत होत्या. त्यांच मराठी फार छान आहे. मी पहिल्या दिवशी भानावर होते. पुढचे आठ दिवस मी अजिबात भानावर नव्हते. कारण माझा पहिला दिवस कामाचं इम्प्रेशन पाडून झालं होतं. त्यानंतर आठ दिवस मी फक्त त्यांच्याकडे बघत बसायची. एकदा कधीतरी त्यांची नितळ कांतीला कधीतरी हात लावेन असा चान्स मी बघायचे. ते दोन तीन वेळा झालं देखील. अगदी त्यांनी हातात हातही घेतला माझी चौकशी केली. पण माझा इतका ग्रेट अनुभव होता की माझा शूटींगचा शेवटचा दिवस होता त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलवलं.

मी इकडे बाईंना काय तरी देऊ, त्यांना काय द्यायचे याचा विचार करत होती. मी मोगऱ्याचे गजरे आणि कृष्णा-शंकराची मूर्ती त्यांना देऊ अशी भेट देऊ. त्यावेळी त्यांचा स्पॉट दादा मला सांगायला आला की मॅडमने तुम्हाला व्हॅनिटीमध्ये बोलवलं आहे. मी तिकडे व्हॅनिटीमध्ये गेले तर अशी पांढरी शुभ्र व्हॅनिटी होती. त्यात रेखाबाई उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्यात एक सिल्क क्रीम रंगाचे गाठोडे होते. त्यावेळी त्यांनी ते माझ्या हातात दिलं.

त्यावेळी त्या मला म्हणाल्या, आज तुझा शेवटचा दिवस आहे ना बाळा, तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे? तुम्ही माझ्यासाठी… मी तिकडे तुमच्यासाठी काय घेता येईल हे बघते आणि तुम्ही माझा शेवटचा दिवस कोणता आहे काय वैगरे सर्व शोधून त्यांनी माझ्यासाठी एक गोष्ट आणली तर ती होती काळी कांजीवरम…., त्या गाठोड्यात कांजीवरम साडी, एक फोटो आणि त्यावर एक मेसेज लिहिला होता. ते सर्व पाहून माझे डोळे पाणावले होते. मला ते वाचताही येत नव्हते. त्यांनी मला बसवलं आणि त्यावर त्यांनी काय लिहिलंय ते वाचून दाखवलं. त्यानंतर त्यांनी ती साडी खांद्यावर टाकली आणि मग ज्या आरशात त्या बघतात त्या आरशात आज मी स्वत:ला बघत होते. त्यावेळी त्यांनी कशी दिसतेय बघ वैगरे विचारपूस केली. त्यामुळे हा दिवस न विसरण्यासारखा आहे.

तो जो आशीर्वाद मला मिळाला. त्या साडीची घडी मी अजूनही मोडलेली नाही. काही गोष्टी असतात ज्या तशाच ठेवाव्यात असे वाटते. त्यातलीच ती एक आहे. ते गाठोडे तसंच ठेवलं आहे. कधीतरी एकदा उघडून ती खराब झालेली नाही ना हे पाहते. तो न विसरणारा प्रसंग होता. त्यांना माझं काम खूप आवडलं, माझा खूप प्रयत्न आहे की आमच्या नाटकाच्या १०० व्या प्रयोगाला त्यांना बोलवायचं. पण येतील किंवा नाही हे माहिती नाही”, असे विशाखा सुभेदार म्हणाली.

आणखी वाचा : “एखादी जाडी बाई…” विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत

दरम्यान अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vishakha subhedar share interesting story about actress rekha during super nani movie shooting nrp
First published on: 26-09-2022 at 13:01 IST