मुंबई : अनेक वाहिन्यांवरील मालिकांचा टीआरपी सध्या घसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. मालिकांच्या कथांमध्ये तोच रटाळपणा पाहायला मिळत असल्यामुळे प्रेक्षकही मालिकांना फारसा प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. टीआरपीच्या या जंजाळात वाहिन्या गुंतलेल्या असतातच, परंतु तरीही प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असते असे म्हटले तर गैर होणार नाही. गेली अनेक वर्षे विविध विषयांवर आधारित नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचे काम झी मराठी वाहिनी सातत्याने करत असते. मात्र, झी मराठीच्या प्रेक्षकांना या वाहिनीवरील काही जुन्या मालिका पुन्हा पाहण्याचा मोह काही आवरत नाही. त्यामुळेच जवळपास १० वर्षांनंतर राजकारण्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वाचीच गुपिते पुन्हा एकदा उलगडण्यासाठी बहुचर्चित कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांचे अप्रतिम सूत्रसंचालन असलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचे हे पर्व सर्वार्थाने वेगळे असणार आहे. या पर्वाचे खास आकर्षण असणार आहे एक खास ‘खुर्ची’. राजकारण, मनोरंजन क्षेत्र किंवा कॉर्पोरेट जग; जगाच्या पाठीवरील प्रत्येक क्षेत्रात खुर्ची मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला आणि अनुभवायला मिळतेच. त्यामुळे अवधूत गुप्ते पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत राजकारणी, कलाकार व इतर क्षेत्रांतील मान्यवरांना त्या खास खुर्चीत बसवून खुपणारे प्रश्न विचारण्यास सज्ज झाले आहेत. दरवेळी वाहिनीवर नवी मालिका येणार म्हणजे सुरू असलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत त्या जागी ती मालिका सुरू होणार हे निश्चित असते. मात्र, या वेळी असे नसून प्रेक्षकांना दर रविवारी ही मालिका पाहता येणार आहे. तसेच, ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या जागी ‘लवंगी मिरची’ ही मालिका प्रेक्षकांना बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता पाहता येणार आहे. त्याशिवाय खास प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दुपारी १२.३० वाजता प्रक्षेपित होणारी ‘यशोदा’ ही मालिका आता दररोज सायंकाळी ६ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार असून ‘होम मिनिस्टर’ ही मालिका अर्धा तास आधी ५.३० वाजता प्रसारित होणार आहे.