आज तरुण मंडळींसह अनेक विवाहित जोडपी व्हेलेंटाइन साजरा करत आहे. यानिमित्ताने कलाकार मंडळींही सोशल मीडियावर आपल्या जोडीदारसह फोटो शेअर करून खास पोस्ट लिहिताना दिसत आहेत. या प्रेम दिवसाचं औचित्य साधत गायिका आर्या आंबेकरचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ‘दबक्या पावलांनी आली’ हे गाणं आर्याच्या सुमधूर आवाजात प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘फतवा’ या चित्रपटातील ‘चोरू चोरून’ गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर याचं फिमेल व्हर्जन नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली. एका वाघाची शिकार एका हरणीने केली’ या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं. करोडो चाहत्यांनी यावर व्हिडीओ स्वरुपात रील्स बनवल्या होत्या. रसिक प्रेक्षकांनी हे गाणं अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्याचं गाण्याचं फिमेल व्हर्जन गायिका आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजात आपल्या भेटीला आलं आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन संजीव-दर्शन यांनी केले असून आकर्षक गीतरचना डॉ. विनायक पवार यांनी लिहिली आहे. या गाण्यात अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत हे कलाकार पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ‘शिवा’ मालिकेतील ‘तो’ सीन व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “कार्टून दाखवताय का लहान मुलांना…”

अभिनेता प्रतिक गौतम या गाण्याविषयी संवाद साधताना म्हणाला, “फतवा चित्रपटातून मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, तसंच मी त्यात मुख्य नायकही होतो. विशेष म्हणजे चोरू चोरून गाण्यातील एका वाघाची शिकार एका हरणीने केली. या शब्दामुळे हे गाणं संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. भारतातचं नाही तर अगदी जागतिक स्तरावर मला या गाण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. परदेशातून रील्स, मीम्स, कमेंट्सचा जणू पाऊस पडत होता. मला दररोज मेसेज यायचे की याचं फिमेल व्हर्जन आलं पाहिजे. तर मी विचार केला. या गोष्टीचं उत्तर द्यायला हवं. की वाघाची शिकार एका हरणीने केली तर आता पुढे कायं? त्यामुळे मी ठरवलं की आपण याचं एक फिमेल व्हर्जन करुया. कारण जर हे गाणं इतकं हवहवंस वाटत आहे. तर माझी ही जबाबदारी आहे की हे गाणं नायिकेच्या बाजूने देखील मांडलं पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात आधीच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि दुसरं म्हणजे हे गाणं आर्याने गायलं आहे. अतिशय सुंदर बनलं आहे हे गाणं. आर्या आंबेकरने खूप गोड गायलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध सुद्धा सुरेख केलं आहे. संजीव – दर्शन यांचं संगीत आहे. सर्व कानसेन रसिक प्रेक्षकांना हे गाणं अगदी भावेल याची मला खात्री आहे. तसंच मी भविष्यात उत्तमोत्तम चित्रपट आणि नवी गाणी आणण्याचा प्रयत्न करेन.”