Aarya Ambekar Talks About Fame and Success : ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे घराघरांतून ओळखली जाणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. आर्याने आजवर तिच्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आर्या सोशल मीडियाच्या माध्यामातूनही तिच्या गाण्यांचे व्हिडीओ, रील शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.
आर्याने आजवर अनेक मालिका, चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. यासह ती लाईव्ह कार्यक्रमांमध्येही सादरीकरण करत असते. वेगवेगळ्या माध्यमातून ती गायन सेवा करत असते. आर्या मराठीतील प्रसिद्ध गायिकांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी आर्याने ‘मिर्ची मराठी’ला मुलाखत दिली होती. यामध्ये तिला “एक कार्यक्रम झाल्यानंतर कोणती गोष्ट तुम्ही विसरायला हवी, जर तुम्हाला आयुष्यात असंच पुढे जायचं असेल आणि कुठलं ओझं नको असेल तर असं तुला वाटतं”, असा प्रश्न विचारण्यात आलेला.
आर्या यावर म्हणाली, “प्रसिद्धी आणि कौतुक. तुम्ही कोण आहात, तुमचं गाणं कसं आहे आणि तुम्हाला कुठे जायचं आहे. हे तुमचं तुम्हाला आधी माहिती पाहिजे. नाहीतर कोणीही उठ-सूट येऊन अरे आज तू जे गायलीस ना त्याला तोडच नाही, काय गायलीस तू असं म्हणेल आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला तर संपला विषय.”
आर्या पुढे म्हणाली, “लोकांना जरी माझं गाणं आवडलं असलं तरी मला माहीत पाहिजे की मी कुठे चुकले. मला त्यात अजून काय सुधारणा करायची आहे.” आर्या पुढे लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांच्याबद्दल म्हणाली, “ते एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, यश आणि विद्या याचा काहीही संबंध नाहीये. विद्या एकीकडे ग्रहण करायची असते आणि मग त्याच्यानंतर यश मिळालं, प्रसिद्धी मिळाली तर ठीक; पण त्याचा आणि तुमच्या अनुभवाचा तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा याच्याशी काहीही संबंध नाही.”
दरम्यान, आर्या आंबेकर गायनासह अभिनेत्री म्हणूनही ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून झळकली होती. यातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता सध्या आर्या गायनात तिचं संपूर्ण लक्ष केंद्रित करत असून नुकतंच तिने महेश मांजरेकर यांच्या ‘देवमाणूस’ या चित्रपटासाठी गाणं गायलं होतं. मराठीसह ती हिंदी गाणीदेखील गात असते. तिने अनेक प्रसिद्ध मराठी मालिकांसाठी व चित्रपटांसाठी दिग्गज गायक गायिकांसह काम केलं आहे.