Abhinay Berde Share Memory Of Laxmikant Berde : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर नाव होतं आणि आजही आहे. लक्ष्मीकांत बेर्डेंनी फक्त मराठी नाही, तर हिंदी सिनेसृष्टीलाही आपल्या अभिनयाने वेड लावले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेनेदेखील या क्षेत्रात एन्ट्री केली. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून त्याने मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा हा चित्रपट बराच गाजला होता.

‘ती सध्या काय करते’ नंतर ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४’ या चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. शिवाय तो ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशातच नुकताच त्याचा ‘ऑल इज वेल’ नावाचा मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने अभिनेता अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे.

अशातच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनयने वडील लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल आठवण काढली आहे. यावेळी अभिनयला लक्ष्मीकांत बर्डेंकडून कोणती गोष्ट शिकायला आवडली असती, असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना अभिनय म्हणाला, “लहान तोंडी मोठा घास घेतो. जसा तेंडुलकरांच्या खेळण्याचा अचूक टायमिंग आहे, तसंच लक्ष्मीकांत बेर्डेंचा विनोदाचा टायमिंग आहे; त्यामुळे त्यांचं टायमिंग स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे.”

अभिनय बेर्डे इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर अभिनय म्हणाला, “लक्ष्मीकांत बेर्डेंचा हजरजबाबीपणा तुम्हाला नाही येणार, कारण तो त्यांच्या स्वभावातच होता. पण, विनोदातलं टायमिंग त्यांनीसुद्धा खूप सरावाने आणि खूप काम करून स्वत:मध्ये आणलं होतं, त्यामुळे आशा आहे की ते मलाही करता येईल. त्यामुळे त्यांच्याकडून विनोदाचं टायमिंग आणि कामातला प्रामाणिकपणा या दोन गोष्टी मला घ्यायला आवडतील.”

यापुढे अभिनयने सांगितलं की, “त्यांच्या कोणत्याच कामात तुम्हाला खोटेपणा वाटणार नाही. मग ते विनोदी सीन असो किंवा भावूक सीन असो. मुख्यत: भावूक सीनमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे तुम्हाला कधीच खोटे वाटणार नाहीत. त्यांच्या डोळ्यांत येणारे अश्रू हे खरे असतात आणि हे जाणून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनयच्या ‘ऑल इज वेल’बद्दल सांगायचं झालं, तर या चित्रपटात त्याच्याबरोबर रोहित हळदीकर आणि प्रियदर्शन जाधव हे कलाकार आहेत. तीन मित्रांची गोष्ट या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या तिघांसह चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदी कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.