मराठीसह बॉलीवूड कलाविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या ‘ओले आले’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट येत्या ५ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अलीकडे नाना पाटेकरांनी अनेक ठिकाणी मुलाखतींना हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी देशातील सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मत मांडताना नाना पाटेकर महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “राजकीय परिस्थितीवर बोलणं आता मी सोडून दिलंय कारण, एकाच्या बाजूने बोललं की दुसऱ्याला खटकतं. पूर्वी अशा गोष्टी नाही व्हायच्या. मध्यंतरी मी पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात ते किती अप्रतिम काम करत आहेत असं एक विधान केलं होतं. एखादा माणूस छान काम करत असेल, तर चांगलं म्हटलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत टीका करणं गरजेचं आहे का? यावर काहीजण तुम्ही आता मोदी भक्त झालात असं म्हणाले…हे ऐकल्यावर मी म्हणालो, ठिक आहे मग तसं म्हणा.”

हेही वाचा : मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी! थाटामाटात पार पडला स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीचा लग्नसोहळा, फोटोंनी वेधलं लक्ष

नाना पाटेकर पुढे म्हणाले, “कौतुक केलं म्हणजे मी कोणाचा भक्त झालो का? मी कोणत्याही पक्षाची कास कधीच धरलेली नाही. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचं कौतुक करण्यात वाईट काहीच नाही. शरद पवार एकेकाळी माझे हिरो होते असंही मी म्हटलंय. आजही फडणवीस जेव्हा भाषण सुरू करतात ते फार मुद्देसूद असतं. नितीन गडकरींनी त्यांच्या भाषणात सांगितलेली सगळी आकडेवारी ऐकून त्यांचा किती अभ्यास असेल हा विचार करून देखील कमाल वाटते. ही मंडळी खरंच खूप चांगलं बोलतात. याचा अर्थ मी फडणवीस किंवा गडकरींचा भक्त झालो का? आता यातून कोणी काय समजायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.”

हेही वाचा : बहिणीची काळजी घे रे! गौतमीच्या लग्नात मृण्मयी देशपांडेने पिळला स्वानंदचा कान, शेअर केला लग्नसोहळ्यातील खास क्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नाना पाटेकर नेहमीच राजकीय व सामाजिक घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. त्यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांना वडील-मुलाच्या नात्याची प्रेमळ गोष्ट पाहता येणार आहे. हा ‘ओले आले’ चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये नाना पाटेकरांसह सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.