प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच देशाचा इतिहास, राजकीय परिस्थिती, सामाजिक घडामोडी याविषयी आपली परखड मतं मांडत असतात. त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये दमदार अभिनय करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शरद पोंक्षेंची मुख्य भूमिका असलेलं ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं. शरद पोंक्षे या नाटकाचे पुन्हा ५० प्रयोग करणार आहेत अशी जाहिरात सर्वत्र प्रसिद्ध झाल्यावर नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असा वाद उद्भवला आहे.

हेही वाचा : “रसिकांना खरंच मायबाप का म्हणतात ते समजतंय” अक्षय केळकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

निर्माते उदय धुरत यांनी नाटकाचं शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला आहे. ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी १० जुलै १९९८ साली रंगभूमीवर आणलं होतं. या नाटकाचं दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केलं होतं. शरद पोंक्षे यांनी त्यात नथुरामची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक खूप चर्चेत राहिलं. २०१६ मध्ये निर्माते उदय धुरत यांचं नाटक थांबवण्यात आलं आणि दुसरीकडे, २०१६ मध्ये शरद पोंक्षे यांनी स्वतंत्रपणे लिहिलेलं ‘हे राम नथुराम’ नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

हेही वाचा : सायलीला वाचवण्यासाठी प्रतिमा घेणार एन्ट्री, ‘या’ दिवशी असेल ‘ठरलं तर मग’ मालिकेचा विशेष भाग, प्रोमो आला समोर

नाटकाच्या नावावर उद्भवलेल्या वादावर शरद पोंक्षे लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, “‘हे राम नथुराम’ या नाटकाचे २०१६ पासून मी ११० प्रयोग केले. त्यानंतर २०१८ मध्ये मी ते नाटक बंद केलं. तेच नाटक आज खास लोकाग्रहास्तव मी पुन्हा एकदा करणार आहे. गोपाळ गोडसे यांचा नातू अजिंक्य गोडसेकडून मला जानेवारीच्या दरम्यान पुन्हा नाटक सुरु करण्याच्या मागणीसाठी पत्र आलं. त्यामुळे हे नाटक नव्याने सुरु करण्याचा मी निर्णय घेतला. या निर्मात्यांनी २०१६ मध्येच ‘नथुराम गोडसे बोलतोय’या नावावर आक्षेप घेतला होता. तसं पत्र त्यांनी सेन्सॉरला पाठवलं होतं. २०१६ मध्ये प्रयोग सुरु होण्यापूर्वी मी अनेक नाट्यगृहं आरक्षित केली होती. त्यामुळे अचानक नाव काय ठेवणार असा प्रश्न मला पडला. सेन्सॉरच्या ऑफिसमध्ये उभा असताना मला ‘हे राम नथुराम’ हे नाव सुचलं.”

हेही वाचा : “मला अजूनही हे घर…” सई ताम्हणकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “उद्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नव्या नाटकाचं शीर्षक सुचल्यावर मी तिथेच सेन्सॉरला एक पत्र दिलं होतं की, जर आधीच्या निर्मात्यांनी पुढच्या १५ दिवसांमध्ये त्यांच्या नावावर दावा किंवा याचा कोणताही पुरावा दिला नाही, तर ते नाव मला परत मिळावं. सेन्सॉरच्या अधिकृत पत्राचा पुरावा माझ्याकडे आहे. तरीही १५ दिवसांत त्यांनी काहीच केलं नाही. २०१६ ते आज २०२३ पर्यंत आधीच्या निर्मात्यांनी त्यांच्या नावाबाबत कोणतंही पत्र सादर केलं नव्हतं. त्यामुळे मी सेन्सॉरला रितसर पत्र पाठवून पुन्हा एकदा ‘नथुराम गोडसे बोलतोय’हे जुनं नाव परत मिळावं अशी मागणी केली आणि त्यांनी मला नाव बदलून दिलं. आमच्या नाटकाचं नाव त्यांच्याशी जुळत असल्याने त्यांच्या पोटात दुखायला लागलंय. त्रास द्यायचा म्हणून हे सगळं सुरु आहे. लोकांना फक्त छळायचं आणि त्रास द्यायचा या पलीकडे त्या माणसाने काहीच केलेलं नाही. आजही नाटकात १९९८ पासून काम करणारे कलाकार आहेत. त्यामुळे याप्रकरणी मी सध्या जास्त काहीच भाष्य करणार नाही. त्यांनी न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे…त्यांनी खुशाल कोर्टात जावं, आपण लढाई कोर्टात लढू. कोर्टातील लढाई चालू असताना माझे प्रयोगही चालूच राहतील. मला फक्त ५० प्रयोग करायचे आहेत. मी अतिशय शांत असून मला कसलीच भिती नाही. कसं शांत राहायचं हे या नाटकामुळेच मी शिकलो आहे.” असं शरद पोंक्षे यांनी सांगितलं.