मराठी अभिनेता सुबोध भावे हा कायमच चर्चेत असतो. सुबोधनं मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. सोशल मीडियावर सुबोध नेहमी सक्रिय असतो. नुकतंच सुबोधनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा- “सतीश तारेंसारखा दुसरा नट…”, वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “त्यांना किंग ऑफ टायमिंग…”
सुबोधनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हरणाचा फोटो शेअऱ केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं लिहिलंय. “जिंकणं पाहिलं नाही; हरणं मात्र पाहिली”. सुबोध भावेच्या या पोस्टनंतर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
सुबोध भावेच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करीत आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलंय “तुम्हीच एकदा एक विनोद सांगितला होता.. या जगात फक्त जिंकणं असतं.. हरणं जंगलात असतात.. तीच दिसत असतील बहुतेक” तर दुसऱ्यानं “या हरणांनी मन हरण केलंय का? लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या कलाकाराला आणखी काय जिंकायचं बाकी आहे?” अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा- प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाला प्रेक्षकांची पसंती, अवघ्या २ महिन्यांत दिली आनंदाची बातमी
सुबोध भावेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच सुबोध भावेचा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुबोधनं या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत घोषणा केली होती. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली या संगीतमय चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. सुबोधनं या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं. आता त्याचा दुसरा संगीतमय चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.