मृणाल कुलकर्णी या मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री, दिग्दर्शिकांपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध चित्रपट मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनय क्षेत्रामध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी काही वर्षांनी दिग्दर्शनात पाऊल टाकलं. त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकण्याचा मोठं कारण त्यांचा मुलगा विराजस होता, असा खुलासा स्वतः विराजसने केला आहे.
मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस अभिनेता असण्याबरोबरच उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकही आहे. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी त्याने लेखक-दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच त्याला त्याच्या घरच्यांकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला आहे. आता विराजसने ‘मदर्स डे’निमित्त त्याचा आणि त्याच्या आईचा एक खास किस्सा सांगितला आहे.
आणखी वाचा : मृणाल कुलकर्णी यांनी खाल्ले होते तळलेले किडे, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “त्याची चव…”
‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी माझ्या मित्रांबरोबर प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत होतो. आपल्या मनासारखं नाटक करता यावं यासाठी आम्ही मित्रमंडळींनी मिळून एक नाट्य संस्था सुरू केली. या नाट्य संस्थेच्या अंतर्गत मी ‘ॲनाथमा’ हे पहिलं इंग्रजी नाटक लिहिलं. पुण्यातून या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकाचे सर्व शो हाऊसफुल होत होते. हे पाहून माझ्या आईला खूप अभिमान वाटला आणि ती मला म्हणाली की, आता मीही दिग्दर्शनात पाऊल टाकते. आणि तिने तिचा ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला.”
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटानंतर मृणाल कुलकर्णी यांनी ‘रमा माधव’ या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं. अभिनेत्री मृणाल कुलकर्णींबरोबरच दिग्दर्शिका म्हणूनही त्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. तर आता जवळपास नऊ वर्षांनी त्या दिग्दर्शनामध्ये पुनरागमन करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी त्यांच्या आगामी ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्या करणार आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.