मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी चर्चेत असते. सुंदर, गोड व सोज्वळ अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. नुकतेच प्रार्थनाने तिच्या दोन अपूर्ण इच्छांबाबत भाष्य केले आहे.

हेही वाचा- ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर पुन्हा एकत्र, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर

प्रार्थना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. प्रार्थनाने काही दिवसांपूर्वीच स्वत:चे यूट्युब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, प्रार्थनाने तिच्या अजूनही अपूर्ण राहिलेल्या दोन अपूर्ण इच्छांबाबत भाष्य केले आहे. प्रार्थनाला तिचा नवरा अभिषेकबरोबर पॅरिस ट्रिपला जायचे आहे. तसेच लहान मुले आणि प्राण्यांसाठी आश्रम सुरू कऱण्याची तिची दुसरी इच्छा आहे. प्रार्थना सोशल मीडियावर अनेकदा मुक्या प्राण्यांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असते. आपल्या पाळीव श्वानांचा प्रार्थना मुलांप्रमाणे सांभाळ करीत असते. यावरूनच तिचे मुक्या प्राण्यांवरचे प्रेम दिसून येते.

२००९ साली प्रार्थनाने मालिकाविश्वात पदार्पण केले. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतील प्रार्थनाने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. तसेच २०१५ साली प्रदर्शित झालेल्या मितवा या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक झाले होते. या चित्रपटात तिच्याबरोबर स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २०१७ साली प्रार्थनाने प्रसिद्ध दिग्दर्शक अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही काळ प्रार्थनाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने पुन्हा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून पुनरागमन केले. या मालिकेत तिच्याबरोबर श्रेयस तळपदे आणि संकर्षण कऱ्हाडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.