Sairat Fame Rinku Rajguru Dance Video : रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सैराट’ सिनेमा २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने मराठी बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच जादू निर्माण केली होती. ‘सैराट’ने १०० कोटींचा गल्ला जमावून इतिहास रचला होता. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. याशिवाय या सिनेमाचा राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मान करण्यात आला होता.

‘सैराट’ सिनेमातील गाणी आज ९ वर्षांनंतरही सर्वत्र तुफान लोकप्रिय आहेत. या सिनेमामुळे आर्ची-परश्याची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती. विशेषत: आर्चीचा बेधडक आणि रुबाबदार अंदाज सर्वांच्या पसंतीस उतरला होता. आता पुन्हा एकदा या सिनेमाच्या आठवणी ताज्या होण्याचं कारण म्हणजे रिंकूने केलेला जबरदस्त डान्स.

‘सैराट’ सिनेमाची मुख्य अभिनेत्री रिंकू राजगुरुने नुकताच “सैराट झालं जी…” या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. पारंपरिक लूकमध्ये सुंदर असा पारंपरिक ड्रेस घालून रिंकूने ‘सैराट’ गाण्यावर ठेका धरला होता. लोकप्रिय कोरिओग्राफर नोएल अलेक्झांडर याने तिला ‘सैराट’ गाण्यावर डान्स करताना साथ दिली.

रिंकू राजगुरुच्या डान्सचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

रिंकू राजगुरु या डान्स व्हिडीओला कॅप्शन देत लिहिते, “पहिलं ते पहिलंच असतं…सैराट झालं जी” अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “एकदम झकास रिंकू ताई”, “मस्तच…अजून काय हवं”, “आता हा ट्रेंड पूर्ण झाला”, “आता सैराटचा दुसरा भाग काढा”, “रिंकू लय भारी डान्स” अशा प्रतिक्रिया युजर्सनी अभिनेत्रीच्या पोस्टवर दिल्या आहेत.

याशिवाय बहुतांश नेटकऱ्यांनी, “व्हिडीओमध्ये फक्त आकाश ठोसरची कमी आहे”, “रिंकू आणि आकाशने एकत्र डान्स केला पाहिजे”, “मिसिंग आकाश ठोसर अशा कमेंट्स व्हिडीओवर केल्या आहेत.” कारण, सिनेमाने परश्याची भूमिका त्यानेच साकारली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रिंकू राजगुरुच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आजवर ‘झिम्मा २’, ‘झुंड’, ‘कागर’ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. आता अभिनेत्री ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या सिनेमात झळकणार आहे. यामध्ये रिंकूसह प्रार्थना बेहेरे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २२ ऑगस्टला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.