रिंकू राजगुरु मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’मधून रिंकू घराघरात पोहचली. या चित्रपटात रिंकूने साकारलेलं आर्ची हे पात्र चांगलंच गाजलं. मराठीबरोबरच रिंकूने बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता रिंकू लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटात झळकणार आहे. ‘झिम्मा २’ नंतर रिंकूच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. रिंकूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अगामी चित्रपटाचे नाव जाहीर केलं आहे.
रिंकू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तीच चाहत्यांना अपडेट देत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिंकूने एक पोस्ट शेअऱ केली आहे. या पोस्टमध्ये रिंकूने तिच्या अगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. ‘आशा’ असं तिच्या अगामी चित्रपटाचं नाव आहे. पोस्टमध्ये रिंकूने या चित्रपटातील तिचा लूक शेअर केला आहे. फोटोवरून रिंकू चित्रपटात एका विवाहित स्त्रीची भूमिका साकारणार असल्याचं दिसून येत आहे.
रिंकूच्या कामाबाबत बोलायचं झाल्यास ‘सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून रिंकूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता येत्या २४ नोव्हेंबरला रिंकूचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटात रिंकू तानिया हे पात्र साकारणार आहे. हेमंत ढोमे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिंकू राजगुरुबरोबर या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा- “माझी गर्लफ्रेंड नाराज झाली आहे…”, उमेश कामतकडे चाहत्याने मांडली व्यथा, अभिनेता म्हणाला, “याला मी…”
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटात रिंकूने आपला ठसा उमटवला आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात रिंकू झळकली होती. नागराज मंजुळे यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. तसेच रिंकूच्या ‘२०० हल्ला हो’ आणि ‘हंड्रेड’ या वेबसीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.